लेखांक ४६.
१७०१ पौष शुद्ध १४ श्री. २० ज्यानुआरी १७८०.
पु॥ सेवेसीं विनंति ऐसीजेः- स्वामींनीं पत्रीं लिहिलें होतें कीं, इंग्रेजाची व नायमाराची लढाई जाहाली. नायमार यांणीं इंग्रेज सिकस्त केले. ऐसें वर्तमान इकडे आहे. पैगाम वर्तमान येत असेल. नवाबबहादूर यांस पुसोन कच्चें वर्तमान ल्याहावें. नवाबबहादर यांचा स्नेह जाहला, त्यापक्षीं वर्तमान चहूकडील परस्परें कळत असावें म्हणून. त्यावरून हें वर्तमान नवाबसाहेबास विचारलें. त्यांणीं सांगितलें कीं, महीबंदर फरासीसाचें; तेथें गुदस्ता इंग्रजांनीं तसदी केली. सबब, फुरासीसानें तें बंदर आपल्यास पेशकसींत दिल्ह्यावर, इंग्रजास तंबी करून बंदराचा बंदोबस्त केला. आपलेकडील लोक व नायमार तेथें ठेविले आहेत. त्यांनीं, बंदरमजकुरीहून, पुढें तलचेरी बंदर इंग्रजाचें आहे तेथें जाऊन, इंग्रजास लढाई देऊन, बंदरमजकुरास शह दिल्हा आहे. याप्रों। स्वमुखें सांगितलें.