पै ।। छ २७ मोहरम, सनसमानीन, लेखांक ४४. १७०१ पौष शु ।। १५.
मयाव आलफ मु।। श्रीरंगपट्टण. श्री. २१ ज्यानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पोष्य बाबूराव विश्वनाथ वैद्य साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल त।। पौष शु॥ १५ जाणोन स्वकीय लेखन करणें. विशेषः–आपणाकडून बहुत दिवस पत्र येऊन संतोषवृत्त कळत नाहीं. ऐसें न करितां सर्वदा पत्र पाठऊन संतोषवृत्त लिहीत असावें. यानंतर आम्हांकडील वर्तमान तर, सर्व यथास्थित असे. आम्ही श्रीमंतापासीं आहों. चिरंजीव कासीराव याचें लग्न मार्गशीर्ष वद्य ७ पुण्यात जालें. लग्नाकरितां आलों, ते येथेंच आहों. चिरंजीव माधवराव याचे लग्न माघमासीं करावें, हें मानस आहे. वांईप्रांतींच कोठें योजना होईल. आठ पंधरा दिवसांनीं श्रीमंतांची आज्ञा घेऊन घरास जाऊं. आपणांस कळावें. वरचेवरी पत्र पाठऊन संतोषवीत जावें. तात्या, लोभांत ममतेंत अंतर नसावें. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा. हे विनंति.