लेखांक ४२.
१७०१ पौष शुद्ध १४. श्री. २० ज्यानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नाना स्वामींचे सेवेसीं: -
पोष्य कृष्णराव नारायण जोशी सां। नमस्कार विनंति येथील कुशल ता। छ १२ मोहरम मु॥ श्रीरंगपट्टण पावेतों वर्तमान यथास्थित आसे. विशेषः- स्वामींनीं सांडणीस्वारासमागमें छ १९ जिल्हेजचें पत्र नवाबबहादर यांस शादीचीं वस्त्रें व जवाहीर रकमा व थैल्या श्रीमंतांकडून खासगत पाठविल्या, त्या छ ११ मोहरम मुकाम मजकुरीं पाऊन बहुत संतोष जाहाला. पत्रीं लिहिलें कीं, शादीचीं वस्त्रें जवाहीर पाठविलें आहे. वस्त्राची व जवाहीर रकमांची याद आलाहिदा आहे. त्याप्रमाणें तुह्मीं व राजश्री गोविंदराव व राजश्री नरसिंगराव मिळोन नवाबास आहेर करावा. वरकड तुह्मी पोहचून सर्व मसलतीचे अर्थ बोलण्यांत आलेच असतील. अदवानीचा हांगामा मना लौकर व्हावा, ह्मणजे नेमिले मसलतीचें सार्थक, निर्वेधपणें दुषमानाचीं पारपत्यें होतील. येविसींचे पर्याय जाते समयीं तुह्मांस सांगितले आहेत. त्याप्रों। लौकर प्रत्ययास यावें ह्मणोन. ऐसियास, आह्मी बागलकोटाहून निघोन मजल दरमजल आलों. नवाबसाहेब यांचे जिल्हेंत आल्यावर, मार्गीं जागा परामर्ष यथास्थित जाहाला. छ १० मोहरमीं पट्टणानजीक येतांच, नबाबसाहेब यांणीं राजश्री श्रीनिवासराव बाहारकी मातबर सरदार यांस पुढें दोन कोंस सामोरें पाठऊन किल्ल्यानजीक कावेरीतीरीं बागेंत जागा राहावयास आगोदरच करविली होती. नजीक देवस्थान व मंडप अतिउत्तम आहे. तेथें मशारनिले यांणीं समागमें येऊन उतरविलें. भेटीस मुहूर्त छ १२ मीनहूचा निश्चय करून सायंकालीं मातबरास पाठविलें. त्यासमागमें चार घटका रात्रीनंतर मंडळी व लोकसुद्धां सुसमयीं किल्ल्यांत गेलों. भेट जाहाली. भेटीचे समयींचीं वस्त्रें व शादीची वस्त्रें, जवाहीर, थैल्यासहीत निवेदन केलें. अत्यादरें स्वीकार केला. श्रीमंतांकडील व स्वामीकडील कुशलार्थ पुसोन उपचारिक भाषणें परस्परें जाहालीं. चार घटका दरबारांत होतों. नंतर निरोप देतेसमयीं बोलिले कीं, "कितेक मजकूर बोलावयाचे आहेत. त्यास, एक दोन रोजांनीं सूच(ना) करूं, तेव्हां यावें. बोलणें होईल.'' स्वामींकडून दुसरीं पत्रें व थैल्या छ २३ जिल्हेजचीं आंचीवर हजूर छ १२ मिनहूस आलीं, तीं नवाबसाहेब आपल्या थैल्या घेऊन लाखोटे आमचे आह्मांकडे पाठविले. त्या पत्रांतही मजकूर अदवानीचा विस्तारेंकरून होता. त्यास एक दोन रोजांनीं नवाबसाहेब बोलवितील, ते समयीं हाही मजकूर बोलण्यात येईल. सांडणीस्वार ठेऊन घेतले आहेत. बोलण्याचा अभिप्राय सविस्तर मागाहून नवाबसाहेब यांस पुसोन सुतरस्वारासमागमें लेहून पाठऊं. दुसरा मजकूर लिहिला होता जे, नायमाराची व इंग्रजाची लढाई जाली, ह्मणोन इकडे वर्तमान. तेथें तहकीक बातमी असेल. नवाबबहादर यांचा व श्रीमंतांचा स्नेह याअर्थे इकडील वर्तमान तिकडे कळत जाईल. तिकडील वर्तमान इकडे कळवीत जावें ह्मणून. त्याजवरून नवाबसाहेब यांस राजश्री नरसिंगराव यांणीं विचारलें. त्यास महीबंदर नवाबसाहेबाकडे. तेथें नायमार असतात. गुदस्ता नायमार यांणीं लबाडी करून, इंग्रजासीं राजकारण करून, बंदर मजकुरीं बखेडा केला होता. नवाबसाहेब पट्टणास आलियावरी नायमाराची समजाविसी केली. महीबंदरचाही पक्का बंदोबस्त. इंग्रज मागतीं आले होते. त्यासीं नवाबसाहेब यांचे तर्फेनें नायमारांनीं लढाई दिल्ही.