लेखांक ४०.
१७०१ पौष शुद्ध १४. श्री. २० ज्यानुआरी १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंती उपरी. राजश्री श्रीपतराव मोरेश्वर वगैरे यांस नवाबबहादूर यांणीं कांहीं तसदी देऊन पैक्याची निशापाती करून घेतली, ह्मणोन वर्तमान ऐकण्यांत आले. त्यावरून बहुत अपूर्व वाटलें. त्यास, सर्व गोष्टी करारप्रमाणें अमलांत याव्या. येविशीं राजश्री आनंदराव नरसी यांस सांगितले आहे. तेही नवाबबहादूर व राजश्री नरसिंगराव यांस लिहितील. पक्का सलूख जाला, मग तेथें अशा गोष्टी न व्हाव्या. करार प्रमाणेच तरफैन वर्तावें. इकडे तहनामा होणें आणि तिकडे त्यांस तसदी दाखऊन निशा घेणें रीत नाहीं. बहुधा असें जालेंच नसेल. ऐकिल्यावरून लिहिलें आहे. छ २७ मोहरम, सन समानीन, शुक्रवार मु॥ श्रीरंगपट्टण.