पै।। छ १२ जिल्हेज * लेखांक २६. १७०१ मार्गशीर्ष वद्य १०.
समानीन, मुक्काम पट्टण. श्री. १ जानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पे॥ बाळाजी जनार्दन सां. नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेषः-तुह्मी पट्टणास पोहचून नवाबबहादर यांची भेट होऊन सर्व बोलणें जालें असेल. अदवानी तालुकियांतील उपसर्ग अदियाप मना होत नाहीं. सर्व मसलती मोठ्या याकरितां तटून राहिल्या आहेत. नवाब निजामआलीखां बहादूर यांची सर्व तयारी जाली. इंग्रज दुसरे मार्गें अदवानीस येत होते, तेथें फौज पाठऊन तमाम घांटबंदी केली. अदवानीचा हांगामा उठतांच बंदोबस्त करून सिकाकोली तालुकियांत जातील. येथील उपसर्ग मना जाल्याखेरीज त्यांची खातरजमा पटत नाहीं. मकान त्यांचें, यास उपद्रव. तेव्हां दुसरे मोहीमेस ते कसे जातील ? आह्मी त्यांची खातरजमा वरचेवर करितों कीं, बहादरांस लेहून हंगामा मना करवितों. त्याजवर हे स्वस्त आहेत. याउपरीं तुह्मीं बहादरांसीं बोलून हांगामा अदवानीचा आधीं उठवावा. चेनापट्टणाकडे सत्वर जावें. करारप्रमाणें सर्व गोष्टी निभावणींत याव्या. दिवस कांहींच राहिले नाहींत. मोठ्या मसलती सोडून किरकोळी कामांत दिवस जातात, हें ठीक नाहीं. मसलत इंग्रजाची थोर, दिवस थोडे, हें सर्व मरातब बहादर यांचे ध्यानांत आहेतच. तुह्मींही बोलून लिहिल्याप्रों। सत्वर घडावें. अदवानीचा महसरा लौकर उठऊन नवाबबहादरांनीं लौकर चेनापट्टणाकडे जावें. र॥ छ २३ जिल्हेज बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.