लेखांक ५५.
ताराज मुलुक होता ते वख्ती मुकासी साहेब मलिक नेब व शाहाभाई खोजे सदरेस बैसोन देसमुख व देसपांडे मोख्तसर बारा गावीचे बोलाऊन पातशाही हुकूम वाचिला ते वख्ती बोलिले जे जागा जागा चारणकरू वाडे घालून बैसले आहेत त्यास बोलाऊन आणने. त्यावरून जे चारणकरू वाडे घालून होते ते हाजीर जाले त्यास हुकूमप्रमाणे दिवाण बोलिले जे त्यास हुकुमाप्रमाणे वतन करून देऊन कीर्दी अबादानी करणे. ते वेळेस विठोजी व माहादजी गरूड उभे राहिले. अर्ज केला की आपणास वतन करून दिल्हे पाहिजे ह्मणौन अर्ज केला. त्यास देसमुख व देशकुलकर्णी यानी दिवाणास अर्ज करून बेलसर कर्यात सासवड येथील मोकदमीची सनद करून दिली. सिवधरा पेडोला घालून दिल्हा बारा बलुते मेलऊन गाव आबाद करून हकलाजिमा खाऊ लागले. यावर बहिरजी गरूडढ मोकदमी करीत होता तो ह्मातारा जाला. कसाला उरकेनासा जाला. याबदल माउजी माली व काउजी भाली हे दोघे भाऊ मुतालिक ठेविले. बावाजी गरूड याचे लेक मलिक अंबर साहेबापासी चाकरी करीत होते ते जंजी पडिले. खबर गावास आली ह्मणौन मालियानी दुखवटियाचे जेवण केले. ते वेळेस ४२ बेतालीस माणूस मारिले. आपण पलोन गेले. दरोडा पडिला ह्मणौन नाव केले. मारा जाला ह्मणौन गाव वोस जाला तेव्हा देसमुख व देसकुलकर्णी याणी कौल देऊन गावास आणिले. त्यावर विज्यापुरी संभाजी गरूड होता त्यास खबर कळली. तो तेथून गावास आला त्याणे पुसिले जे तुह्मी मुतालिक गावात असता मारा काय बदल जाला ? त्यास त्याणी फिरोन जाब दिल्हा की तुझा मुतालीक कोण ? आपण खावंद आहो. त्या दिवसापासून वेव्हार लागला. मग त्यवर्त देसमुखापासी ठाणा गेले. तेथून मिरासाहेब पुणा होता त्याजवळी उभे राहिले. तेथू खुर्द खत घेऊन मौजे बेलसरचे पांढरीवर श्रीसिधेश्वरापुढे दिव्य केले. खरा जाला हाती पिसविया घालून श्रीच्या दरशनास जेजोरीस गेले. तेथून साकुर्डियावरून सिवरीस गेले. तेथे एक माहार व दोघे कुणबी घेतले व सदूभाई व मिराभाई बराबरी होते ऐसे सासवडास जाता वाटेत खलदर्या रानांत चिचलियाजवळी मालियानी दबा धरून संभाजी गरूड यास मारिले. यावर कितेक दिवस वेव्हार राहिला. त्यावर विज्यापुरी याकूदखान होते त्याजवळी खंडोजी व काउजी गरूड उभे राहिले. त्यास माली गैरहाजीर जाला. यावर बाजी नाईक देसमुख व रामाजी त्रिमल देसपांडे कर्यात सासवड याणी हाती धरून गावास आणिले. त्यावर विल्हे करावी ती केली नाही त्यावर मौजे गाधडी उर्फ सिकरापूर तेथे गरूड उभे राहिले वेव्हार केला तेथे हि माली गैरहाजीर जाला. त्याजवर राजश्री छत्रपती स्वामी थोरले कैलासवासीचे कारकीर्दीस राजश्री बाजी घोलप व हवालदार किले पुरंधर व त्रिंबक गोपाल सुभेदार प्रा। पुणे यानिध वेव्हार केला परंतु निवाडा जाला नाहीं. त्यावर कारकीर्दी मोगलाई जाली. तुलापुरास हजरत पातशाहा होते त्याचा हुकूम अमीन कर्डे व सासवड या दो माहालास एक होता त्यास आणून दिल्हा त्याणी जावजी माली जगथाप यास आणून करीना मनास आणावा तो जावजी माली गैरहाजीर जाला. त्यावर राजश्री संताजी घोरपडे सेनापती त्यापासी आपण जाऊन उभे राहिलो. सेनापतीनी रामाजी माली व मैसा माहार व देसमुख देसपांडे व पाटील कर्यात सासवड हे बोलाऊन आणून जमानती घेऊन गोत दिल्हे तेथून गैरहाजीर जाला त्यावर माउजी नाईक देसमुख व भगवंत कासी देशुकुलकर्णी व फिरगोजी पाटील क॥ सासवड याणी हाती धरून आपणास क॥ मजकुरास आणिले परंतु विल्हे केली नाही. यावर राजश्री नरहर आपदेऊ सुभेदार प्रा। पुणे यापासी उभे राहिलो. परंतु निवाडा जाला नाही. त्यावर राजश्री राजाराम छत्रपती स्वमी यापासी जाऊन उभे राहिलो. त्याणी राजश्री संकराजी पंडित सचिव यास आज्ञा केली जे याचा निवाडा करणे. त्यास राजश्री सचिवपंतीं देसमुख-देशपांडे यांस हुजूर आणून करीना पुसिला आणि राजश्री बालाजी विश्वनाथ सुभेदार प्र॥ पुणे यास आज्ञा केली. त्याणी समस्त गोत मेलऊन मनसुफी करीत होते. त्यावर तान्हाजी माली राजश्री पंतसचिव यापासी जाऊन फिर्याद जाला की साहेबी आपणापासी निवाडा करावा त्यावरून राजश्री सचिवपंती हुजूर बोलाऊन नेले देसमुखदेशपांडे व राजश्री जाधवराऊ सेनापती व राजश्री मल्हारराऊ बाबाजी व बजाजी नाईक निंबालकर व गोत ऐसे बैसोन गोताच्या गला बेलाच्या माला व भंडार व तुलसी माथा ठेऊन पुसिले. त्यास गोताने दोघापासून राजीनामे व तकरीरा घेऊन जमान घेऊन मनास आणून गोताने सांगितले की गरूड खरा आहे यापासी मलिक अंबर याची कारकीर्दीस मुलुक वैरान जाला होता त्या समईची सनद आहे व मारा हि खरा जाला आहे व झगडा हि साथत आला आहे ह्मणौन सांगितले. त्यावरून पांढरी व काली दो ठाई करून तश्रीफ देऊन गावास पाठविले. त्यावर अजमगडी खान सैद किलेदार याणे बोलाऊन नेऊन नारायणपेठेस करीना मनास आणून निवाडा केला. देसमुखदेशपांडे व गोत मेलऊन हकीकत मनास आणिली तेथें खरे जालो. त्याणी पांढरी व काली दो ठाई करून दिली आणि कौल देऊन सिरपाव दोघास देऊन मौजेमजकुरास पाठविले. त्यावर राजश्री पंतअमात्यास जिल्हे जाली ते समई हरदोजणास बोलाऊन नेऊन निवाडपत्र मनास आणिले व त्याचे तर्फेने रामाजी बाबाजी सुभेदार प्रा। पुणे होते त्याणी मनास आणून राजश्री अमात्यपंताचें पत्र व सिरपाव देऊन रवाना केले. यावर प्रतापगडीचे मुकामी महाराज राजश्री शिवाजी राजे छत्रपती याजपासी माली जाऊन उभे राहिले त्यावरून आपणास तलब करून हुजूर नेले मग राजश्री स्वामीनी तान्हाजी माली यास हुजूर नेऊन आपला व मालियाचा करीना मनास आणून माली खोटा जाला, आपली पत्रे मनास आणून मनसुफी करून आपणास पत्र करून दिल्हे. तश्रीफ देऊन गावास रवाना केले. मग राजश्री बालाजी विश्वनाथ व खंडेराऊ दाभाडे यास आज्ञा केली की काली पांढरी दो ठाई वाटून देणे. त्यावरून देसमुख व देशपांडे व गोत व खानचंद किलेदार याचा अमीन मेलऊन राजीनामे तकरीरा घेऊन गाव दो ठाई वाटून दिल्हा. यावर महाराज राजश्री शाहूराजे छत्रपती स्वामी याणी करीना मनास आणून पुर्वील पत्रे मनास आणून आपले पत्र करून दिल्हे. आपला करीना ऐसा आहे हे तकरीर केली सही.