लेखांक २५.
श्री.
१६०५ कार्तिक शुध्द १०.
राजश्री विनायक उमाजी शुबेदार व कारकून सुभा प्रा। पुणे गोसावी यासि
अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य सेवक केसो त्रिमळ नमस्कार सु॥ अर्बा समानैन अलफ प॥ मजकुरीचे देशकुलकर्णी संनिध एउनु विनंति केली की देशमुखास व देशकुलकर्णियांस पेशजी राजश्री दादाजी कोंडदेऊ सुबेदार तिही इनामती खंडणी दर सालास दिधली होनु पातशाही ४००
देसमुख होनु ३०५ देसकुलकर्णी होनु ९५
एकूण च्यारसे होनु खंडणीचा तह दिधला त्याप्रमाणे गलबलिया आधी उसूल होत आला आहे हाली दाहा पाच साले गलबला जाला आहे. माहाल खराब पडला जुजबी गाऊ वसाहत थोडेबहुत आहेत त्यास आपणास व देसमुखास हकाचे दस्त बहुत थोडे होते त्यास दस्त माफीक देशमुखास व आपणास पोटास देउनु वरकड दिवाणांत घेत आहेत. एणेकरून आपला अवकात चालत नाही स्वामीची सेवा करावी लागत आहे. त्याहिमधें आपण वृतिवंत आहो आणि स्वामीची सेवा एकनिष्ठपणे करीत आहों तरी स्वामीने कृपाळु होउनु राजश्री दादाजीपंती इनामती खंडणी होनु ४०० च्यारसे केली आहे ते जे वेळेस सारा परगणा कीर्दी होता तेव्हा च्यारसे होनु खंडणी घ्यावी ऐसा तह केला होता. हाली परगणा कूली खराब जुजबी थोडेबहुत वसाहती आहेती आपणासहि हकउसूल होत नाही तरी स्वामीने कृपाळू होउनु च्यारसे होनु सारा परगणा कीर्दी होता त्या समई दस्तरकमप्रमाणे होते होते. त्या हिसेबे हाली दस्तमवाफीक चौ श्या होनाची तकसीम बसेल ते देसमुखापासुनु व आपणापासुनु जे तकसीम असेल ते घेतलियाने आपलाहि अवकात चालेल व स्वामिसेवेस वृत्तिसंमंधें एकनिष्ठ सेवा करून तरी स्वामीने कृपाळूं होउनु सदरहू विनंति मनास आणून इनामती खंडणीचा तह विनंतिप्रमाणे करून दिल्हा पाहिजे ह्मणउनु देशकुलकर्णियानी विनंति केली. ऐसियास याच्या हकाचाहि हिसेबु पाहातां हाली मुलुक खराब जुजबी वसाहत आहे हक पुरा उसूल होत नाही या निमित्य च्यारसे होनु इनामती खंडणी आहे ते पेशजी प्रमाणे घेतां इनामदार म॥ दिलगीर होताती व त्याच्याहि अवकात चालत नाही याबद्दल हाली यांचा इनामती खंडणीचा तह केला ऐन दस्त साल ब साल होईल त्यास दस्तमाफीक चौश्यां होनाची बेरीज दस्तांप्रमाणे बसेल ते यापासुनु घेत जाणे हाली दस्तहि कमी आहे याबद्दल एणेप्रमाणे तह केला आहे तरी लिहिले प्रमाणे इनामती खंडणी दस्तमाफीक घेत जाणे. जे दिवाणबेरीज इनामती खंडणीची घ्यावयाची असेल ते देसमुखाचे तकसिमेस जे बेरीज बसेल ते त्यापासुनु घेणे. जे देशकुलकर्णियाकडे बेरीज बसेल ते देशकुलकर्णियापासुनु घेणे याहून विषेष तोसिस नेदणे. एविसी राजश्री स्वामी कैलासवासी व राजश्री पंत वैकुंठवासी यांचीहि पत्रे माहालीच्या कारकुनास आहेती तरी तुह्मी लिहिलेप्रमाणे इनामती खंडणी घेणे तालीक लिहून घेउनु असल देसकुलकर्णियापासी देणे रा। छ ८ जिलकाद आज्ञा प्रमाण सुरू सूद