सदरहूजणांसी चांभारकुंड काडुनु, मांगीमाहारीचे वस्त्राची आण घालून, सभानाईकीं ह्मणटिले जे :- बाजी व पुताई मौजे मजकुरीचे मोकदमीबद्दल भांडत आली आहेती, तरी पहिलेपासून यांचे मोकदमीचे बाबें कैसें चालत आलें आहे हें आपलें सत्य स्मरोनु सांगणें. यावरी सदरहूजणी आपलें सत्य स्मरोनु गोही दिल्ही जे :- सिदोजी बिन बाकोजी व बानजी बिन बाकोजी हे दोघेजण सखे भाऊ. वडील सिदोजी, धाकुटा बानजी. यावरी सिदोजीनें धाकटेया भावास बानजीस मोकदमीचे असकेच मान आपले खुसीनें एणेप्रमाणें दिल्हे. कागदीपत्रीं नावनांगर व दिवाणांतील व हरएक ठाईचीं लुगडीं व पानें व दिवाळीचे व हरएक वाजंत्र व दिवाळीचे व हरएक ओवाळणें व होळीची पोळी व वोवाळणी व पोळियाचे बैल व महार व बाजे मान जितुके मोकदमीचे निसबतीचे असतील तितुके तमाम सिदोजीनें बानजीस दिल्हे. याखेरीज काळीसव पांढरीस मोकदमीच्या हाकाचे जें उत्पन्न होईल तें दो ठाईं बराबरी वाटून खावें. त॥
निमें बानजी निमें सिदोजी
एणेप्रमाणें चालत असें. ते दोघेजण मेलियावरीहि बाजी व एसाजी हेहि सरहूप्रमाणें खात असेती. हा आपला इनाम सत्य. एणेप्रमाणें गोही गुदरली व कृष्णाजी पालकपुत्र याचेविशीं बानजी व सिदोजी वरी लिहिलें आहे तेणेप्रमाणें वर्तत होते यावरी उभे वर्ग निवर्तले. त्या उपेरी पुताईचे पोटीचा पुत्र एसाजी असतां पुताईनें पाळकपुत्र कृष्णाजी घेतला, तधीहि बाजी व एसाजी हे दोघे वरी लिहिलेप्रमाणें वर्तत होते. यावरी एसाजी निवर्तलिया उपरीं बाजी ह्मणतो जे :- कृष्णाजी पाळकपुत्र आहे. यास विभाग नेदीं. तरी जर्ही सिदोजी निवर्तलिया- उपेरी त्याचे पोटीचा पुत्र असतां पुताईनें पाळकपुत्र कृष्णाजी घेतला. या उपेरी आपला विभाग भक्षीत असतां पोटीचा पुत्र निवर्तला, तर्ही बानजीचे संततीस सिदोजीचे विभागस संमंधु नाहीं. बानजीचे व सिदोजीचे विभाग पूर्वीच जाहाले आहेती. विभाग जालियाउपेरी विभागाची धनीण सिदोजीची पत्नी पुताई, ते तो विभाग आपण भक्षूं अथवा पालकपुत्रास देऊं, अथवा आणिकास देऊं. ए अर्थी बानजीचे संततीस समंध नाहीं. एदर्थी वचने याज्ञवल्क्य: ॥