लेखांक ७
१५६१.
'' तेरीख ६ माहे जमादिलावल बिहुजूर हाजीर मजालस
राजश्री दादाजी कोंडदेऊ | सेख फेरीद मुजावर + + |
सुबेदार नामजाद किले कोंडाणा व महालानिहाय |
राजा क॥ पुणे |
बापूजी व कानजी देसमुख त॥ खेडेबारे वाद पाटिल मोकदम मौजे खडकवासले बापूजी कुलकरणी मौजे माण |
बालाजी पासलकर देसमुख त॥ मोसे खोरे मालजी बिन हिरोजी चौगुला लोणीकालभोर माहाद पाटिल मोकदम मौजे अंजनगाव |
सु॥ अर्बैन अलफ सके १५६१ प्रमाथी नाम संवछरे महजर केला ऐसा जे साहेबांची रजा सादर जाली जे मालजी भोईटा मौजे रावेत प॥ पुणा हुजूर एउनु मालूम केले जे :- मौजे म॥ पाटिलकी आपली मिरासी वडिल घर आपले आहे, आणि आपला दाइज भिलोजी पाटिलकी करितो; तरी त्याची व आपली बरहक मनुसफी करून निवाडा केला पाहिजे. दरीं बाब सरंजाम होए मालूम जाले तरी प॥ मजकुरीचे दाहा गांवीचे मोख्तेसर पाटील व गावीचे कुणबी व बलुते आणून, बरहक मुनसफी करून निवडा करणे, गोताच्या माथां सत्या घालून ज्याची पाटिलकी होईल त्यास देवणे, ह्मणउनु रजा सादर जालियावरी यास व याचा वाद्या भिलोजीस आणुनु हरदोजणास मनुसफीबदल आदबखान राखिले
यावरी हरदोजणी कतबे दिधले जे हेबी हमशाही गांवीचे मोकदम व आपले दाइज बापभाऊ व बलुते ऐसे बोलाउनु साहेबी त्यांस पुसोन निवाडा केला पाहिजे. स्वगोताच्या निवाड्यास आपण राजी आहे. यास हिलाहरकती करील तो गोताचा अन्याई व दिवाणीचा गुन्हेगार ह्मणउनु हरदोजणी कतबे देउनु निवाडियाबदल हरदोजणी गोही नेमिले. बित॥ हमशाही गांवीचे मोकदम.
सिस पाटील मोकदम मौजे धामण १ बाबजी बिन राधा पाटिल भोडवे मौजे मजकूर १ मोकदम मौजे किवळे १ वासभट बिन रामभट जोसी कुलकर्णी मौजे मजकूर १ तान पाटिल मोकदम मौजे चिंचवड १ कोंड पाटिल मोकदम मौजे गहू १ |
तान पाटिल मोकदम मौजे किन्हई १ गोंदजी भोडवा मौजे मजकूर १ तान पाटिल मोकदम मौजे पुनवले १ एम सुतार बि॥ चांगा सुतार मौजे मजकूर १ ताऊ पाटिल मोकदम मौजे ताथवडे १ हिरा माहार मौजे मजकूर १ |
एणेप्रमाणें गोही नेमिले ते बोलाउनु त्यांस चांभाकुंड काढून, जितके पृथ्वीवरी पाप होते तितके तुमचे माथा ह्मणउनु ऐसी आण घालून पुसिलयावरी सदरहू जिणी गोही दिल्ही जे :- याचा मूलपुरुष ह्याऊ पाटिल तो पाटिलकी करीत होता. त्यास दोन फर्जंद २
वडील राम पाटिल धाकटा साक पाटिल
यासि ह्माऊ पाटिल मेलियावरी पडील लेक रामपाटिल तो मोकदमी करू निघाला. धाकटा साक पाटिल त्याण मोकदमी केली नाही यावरी रामपाटिल पडिलियावरी. रामपाटिलाचा लेक बालपाटिल त्याणें मोकदमी केला. धाकटे घर साकपाटिल. त्याच कोन्हे पाटिलकी केली नाहीं. बालपाटिल मेलियावरी त्याचा लेक सीऊपाटिल मोकदमी केली. तै साकपाटिलाचे घरीं कोन्हे मोकदमी केली नाहीं. मग सीऊपाटिलाचे लेक जाऊपाटिल त्याणें मोकदमी केली. दुसरे धाकटे घरे कोन्हे केली नाहीं. यावरी जाऊपाटिल तुटकपणें पोट भरेना ह्मणउनु खालता गेला. यावरी जाऊपाटिलाचे कोन्ही गावावरी नव्हते, यावरी हरिया पाटिल धाकटे घरिचा त्यास हि कधी भोगवटा नव्हता चालिला, व कधी कोन्हे मोकदमी केली नव्हती. हर्या पाटिल मोकदमी करू निघाला यावरी जाऊ पाटिल गांवास आला. यावरी मोकदमी हरिया पाटिल याची यास दिधली नाहीं, आपणच करीत असे, यावरी जाऊ पाटिल मेलियावरी जाऊपाटिलाचा लेक सीऊपाटिल होता त्यास हि दिधली नाहीं. यावरी जाऊ पाटिलाचा धाकटा भाऊ नाऊ पाटिल त्याचे नातू २ दोघेजण हिरोजी व मालजी ह्मणों निघाले जे :- सीऊजीचा मोकदमी हिसेबी होए ते तूं काय बदल खातोस, ते खाऊं नको ह्मणउनु हिरोजीचा व मालोजीचा +++ डबोजी सांगत गेला जे सीऊजीची मोकदमी हिसेबी होऊ तुझ्या घरीं कोन्ही खादली नाहीं. तूं खाऊं नको ह्मणउनु ह्मणत गेला, परी त्याचे ह्मटलें नाइकेंच. मोकदमी बलेच खात असे. यावरी हिरोजी व मालजी ह्मणत असेत जे, तूं खाऊं नको. त्याचेहि ह्मटले नाइकेच. मग हिरोजीनें व मालजीनें हर्या पाटिल व हर्या पाटलाचा फर्जंद ऐसे दों मारिले, आणि मारून मालजी हुजूर जाउनु सदरहूप्रमाणें हुजरून कागद आणिला. तरी हर्या पाटिलाचे घरे कोन्ही मोकदमी खादली नाहीं. आणि हर्या पाटिल मोकदमी करूं निघाला ह्मणौउनु सीउजीच्या घराण्यांतील हिरोजी व मालजी तिहीं हर्या पाटिल व हर्या पाटिलाचा लेक मारिला आतां हर्या पाटिलाच्या फर्जंदासी मोकदमीसी कांही समंध नाहीं. तिही आपलें सेत कुळवाडी करून असावे. मोकदमीची नांव गोष्ट करील तरी गोताचा हा अन्याई व साहेबांचा गुन्हेगार. हिरोजी व मालजी हे सीऊजीच्या घराणांतील, पण मोकदमीचा धणी सीऊजी. सीऊजीनें आपली मोकदमी करावी नांव नांगर व टिळा विडा व मान माणुसकी व इनामती जें असेल तें साऊजीचें साऊजीनें खाणें. हिरोजीनें व मालजीनें सेत कुळवाडी करून सुखें असावे. हिरोजी व मालजी इही पाटिलकिची नांव गोस्ट करितील तरी गोताचे अन्याई व दिवाणीचे गुन्हेगार हा महजर सही.''