लेखांक ३६.

१६२९ श्रावण वद्य ३०.
हू

'' ई कौलनामा अज रख्तखाने कोट जंजिरे दंडाराजपुरी ताहा देसमुखांनी व देसपांडियानी व मुकदमानी व पटेलानी व रयायानी त॥ कानदखोरे सु॥ आसर मिया व अलफ बादे कोलनामा ऐसा जे :- तुमचे बाबे बाजीराऊ पासलकर व तानाजी नाईक कडु देसमुख त॥ मोसेखोरे येही अर्ज केला कीं, साहेब मेहरबान होऊन त॥ मजकूरचे रयेतीस कौल मर्‍हामत केला, तर गावगना रयत येऊन वस्ति करून कीर्द अबादानी होईल; ह्मणऊन मालुमाती केली. बराय मालुमाती खातिरेस आणोन मामुरिवरी नजर देऊन; तुह्मास कौल मर्‍हामत केला आहे. तरी तपे मजकूरचे गावगना येऊन, वस्ती करून कीर्द अबादानी करणें. आणि चौथाईचा मुकरर असे तेण्हेप्रमाणे सरकारी वसूल देणे. वसूल दिल्हा नाहीं तर कौल नसे. तर सदरहू मुकररी मोजीब वसूल देऊन, खुसी असणें. कोण्हें बाबे शक अंदेशा ना धरणें. दरीबाब कौल असे. पा। हु॥ रा। अलिखजमतगार जबानी येसजी टवया अफराद र॥ छ २८ माहे जमादिलाखन सन ३ जलुस.''

रुजू सुरु सुद.

लेखांक ३७.

श्री.
१६३० आषाढ वद्य १४.
फारसी मजकूर

'' छ २७ माहे रबिलाखर सन ३ जुलुसवाला सु॥ तिसा मियां व अलफ बो। बाजी वलद बापूजी एसवंतराऊ पासलकर देशमुख तर्फ मोसेखोरे नौकर सरकार लेहून दिल्हा कतबा ऐसा जे, कानोजी व॥ बावाजी झुंझारराव देशमुख तर्फ कानदखोरे याचा खुद कबिला व मौजे धानेब व मौजे एलें एथील रयत अ॥ ५२ दस्तगीर स्वारी सेख याकूब सुभेदार बंद आणून जंजिरियांत कैदेंत ठेविले. त्यास, खंड ऐन व भत्ता कोतवाली रुपये ४२१५ एकूण च्यार हजार दोनसे पंधरा करार करून, जामिना बाबे हुकूम केला. त्यावरून आपण माल जामीन असो. इ॥ छ म॥ पासून सदरहू रुपये एका वरसाने सरकारी वसूल देऊं. हें लेहून दिल्हे. सही प्र॥ हु॥ रा। बहादूर जबानी गंगाजी कडू अफराद.''