लेखांक ३५३
श्री १६१३ भाद्रपद वद्य १३
स्वस्ति श्री राज्याभिषेकशक १८ प्रजापति नाम संवत्सरे भाद्रपद बहुल त्रयोदसी सौम्यवासर क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपति याणी बेरड किले पुरंधर यासी दिल्हे अभयपत्र ऐसे जे रा। सर्जाराव जेधे देशमुख रोहिडखोरे हे हुजूर एऊन विनंति केली की पुरंधरचे बेरड किबलियानसी आपणाजवळ आहेत जरी स्वामी कृपाळु होऊन बेरडास अभयपत्र देतील तरी पुरंधरचे राजकारण करून गड हस्तगत करून देतील ह्मणोन त्यावरून हे अभयपत्र दिल्हे असे तरी तुह्मी पुरंधरची हवी करून गड हस्तगत करून देणे कोण्हेविषी शक न धरणे स्वामी तुमचे चालवितील आपले दिलासे असो देऊन एकनिस्टेने स्वामिकार्य करणे तुमची अनकूलता करून चालवायाविसी राजश्री शंकराजी पंडित सचिव यास लिहिले आहे ते चालवितील कोण्हेविषी चिंता न करणे अभय असे जाणिजे तुह्मी पुरंधर हस्तगत करून दिल्हा ह्मणजे स्वामी तुमचे ऊर्जित करितील अभय असे जाणिजे निदेश समक्ष
रुजू