लेखांक ३५२
श्री १६१३ भाद्रपद वद्य १३
स्वस्ति श्री राज्याभिषेकशक १८ प्रजापति नाम संवत्सरे भाद्रपद बहुल त्रयोदसी सौम्यवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपति याणी समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री शंकराजी पंडित सचिव यासी आज्ञा केली ऐसी जे बेरड व कोळी किले पुरंधर हस्तगत करून द्यावयाची उमेद धरिली आहे तरी स्वामीने त्यास अभयपत्रे करून दिल्ही पाहिजेती ह्मणोन सर्जाराव जेधे देशमुख रोहिडखोरे याणी विदित केले त्यावरून स्वामीने बेरडास व कोळियास अभयपत्रे दिल्ही आहेत तरी तुह्मी त्या कोळ्याचे व बेरडाचे दिलासे करून पुरंधरची हवी करवणे आणि जे अनुकूलता करावयाची ते करून देऊन गड हस्तगत होए ऐसे करणे कोळियाची व बेरडाची सरफराजी कार्य सिध जालियावरी जे करावयाची ते करणे याचे चालवायास अंतर पडे न देणे जाणिजे बहुत लिहिणे तरी तुह्मी सुज्ञ असा