लेखांक ३५१
श्री १६१३ भाद्रपद वद्य १०
स्वस्ति श्री राज्याभिषेक शक १८ प्रजापतिनाम संवत्सरे भाद्रपद बहुल दशमी इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपति याणि समस्त सेनाधुरंधर राजमान्यराजश्री संताजी घोरपडे सेनापति यासि आज्ञा केली ऐसि जे मा। सर्जाराऊ जेधे देसमुख ता। रोहिडखोरे हे स्वामीसनिध येऊन मावलप्रांतीचे व पुरंधर व जुनर या प्रांतीचे कितेक वर्तमान विदित केले त्यावरून यास त्या कार्यभागाची आज्ञा करून राजश्री शंकराजी पंतसचिव यास पत्रे देऊन पाठविले आहेत हे जो कार्यभाग करायाचा तो करितील त्या प्रसंगी सेनेकडून साहेता पाहिजेसी होईल तेव्हा तुह्मास लेहून पाठवितील ते करणे आणि कार्यसिध होय ऐसें करणे येविशीं अंतर पडो न देणे जाणिजे बहुत लिहिणे तरी तुह्मी सूज्ञ असा