लेखांक ३४२
१६०७ आश्विन वद्य ३
स्वस्ति श्री राज्याभिषेकशक १२ क्रोधन नाम संवत्सरे आश्विन बहुल त्रितीया इंदुवासरे क्षत्रियकुलावतंश सिव्हासनाधीश्वर श्री राजा शंभु छत्रपति स्वामी याणी सर्जाराऊ जेधे यासि आज्ञा केली ऐसी जे तुह्मी संताजी निंबालकर मुद्राधारी विचित्रगड यासि पत्र लेहून आपला मुद्दा सागोन पाठविला की आपला भाऊ शिवजी जेधा याणे हरामखोरी करून सिरवळास गेला त्याणे आपली गुरे ढोरे वळुनु नेली पुढे आपणास बरे पाहाणार नाही या बदल आपण हि उठोन सिरवळास आलो आहे ऐसियासि आपण राजश्री स्वामीच्या पायाजवळी एकनिष्ठ च आहे स्वामी कृपाळु होउनु आपले वतन देसमुखी आपले स्वाधीन करतील आणि अभयपत्र सादर होईल तरी आपण शेवेस एउनु एकनिष्ठ होउनु शेवा करीन ह्मणून तरी तुमचा मुद्दा मा।इले हवालदार एही स्वामीचे शेवेसी हुजूर लिहिला त्यावरून कळो आला त्यावरून हे आज्ञापत्र तुह्मास लिहिले आहे तरी आधी तुह्मी च सरासरी हरामखोरी केली की वतनदार होउनु इमाने इतबारे वर्तावे ते गोष्ट न करितां स्वामीचे अन्न बहुत दिवस भक्षिले त्याचे सार्थक केलेत की स्वामीच्या पायासी दुर्बुध्दि धरून दोन दिवसाचे मोगल त्याकडे जाउनु राहिलेस तुमचा भाऊ शिवजी गनीमाकडे गेला तो तुह्मास बरे पाहे ना ऐसें होते तरी तुह्मी स्वामिसन्निध हुजूर यावे होते ह्मणिजे तुमचे इतबारपण कळोन एकनिष्ठता कळो एती ते केले नाही तरी बरी च गोष्ट जाली या उपेरी हि गनिमाकडे राहाणे च- असेली तरी सुखे च राहाणे तुमचा हिसाब तो काय आहे ए क्षणी स्वामी आज्ञा करितात तरी गनीमा देखिल तुह्मास कापून काढवीत च आहेत हे बरें समजणें दुसरी गोस्ट की तेथें राहाणे च नाही एकनिष्ठेने स्वामीच्या पायाजवळी वर्तावे ऐसे असेली तरी तुह्मी परमारे मुद्दे सागोन गडकिलियाकडे राबिते काय ह्मणून करिता हे गोस्ट स्वामीस मानत नाही जो राबिता करणे तो स्वामीकडे च करून हुजूर वर्तमान लेहून पाठवावे स्वामी तुमचा मुद्दा मनास आणून आज्ञा करायाची ते करितील तरी ऐसी गोस्ट करावया प्रयोजन नाही उजराती खेरीज दुसरियाकडे एकंदर राबिता न करणे जे वर्तमान लिहिणे ते स्वामीस लिहीत जाणे तुमचे ठाइ एकनिष्ठत च आहे ऐसे स्वामीस कळलियावरी जे आज्ञा करणे ते करून आज्ञापत्र सादर होईल तेणे प्रमाणे वर्तणूक करणे लेखनालंकार
रुजू
रवाना छ ३ जिल्हेज
सुरू सूद