लेखांक ३१०
श्रीशंकर
राजश्री जगोजी जाधव गोसावी यासि
अखंडितलक्ष्मीआलंकृतराजमान्य श्नेहांकित कान्होजी भोसले सेनासाहेब सुभा जोहार उपरी येथील क्षेम जाणून तुह्मी आपले क्षेम लिहित जाणे यानंतर बहुत दिवस तुमचे पत्र येऊन वर्तमान अवगत होत नाही तर सदैव पत्र पाठवित असले पाहिजे विशेष राजश्री फत्तेसिंग भोसले व राजश्री नीळ प्रभू याची पत्रे आह्मास आली होती त्याची उत्तरे जासूद देऊन पाठविली आहेत त्यावरून कळो येईल तुह्मी त्यास सांगोन फौजेसहवर्तमान या प्राते येत ऐसे करणे आपले हरघडी वर्तमान लिहित जाणे रा। छ ७ माहे रबिलाखर बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे ही विनंती