लेखांक २८२
श्री १६१२ चैत्र वद्य ८
(सिका) राजाराम छत्रपति याचा नकल
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके १६ प्रमोदनाम संवत्सरे चैत्र बहुल अष्टमी मदवासरे राजमान्य राजश्री बाजी सर्जाराऊ जेधे देशमुख यास राजाज्ञा अभय दिल्हे ऐसा जे तुह्मी मो। रतनोजी सिंदे व शंकराजी ढगा याजबरोबर कितेक निष्टपणाच्या गोष्टी सांगोन पाठविल्या सांगितले प्रो। विदित जाला ऐसियास हे मराष्टराज्य आहे तुह्मी या राज्याची पोटतिडिक धरता तरी ते प्रांते कितेक राजकारणे आहेत च्यालणा करुन आपण जमाव करून सावधपणे राहून स्वामीकार्य हे दृष्टीस पडले ते मनास आणून हस्तगत करून ठेवणे हुजूर लेहून पाठवणे तेणेप्रमाणे हुजुरुन विल्हे केले जाईल या प्रांतीचे वर्तमान तरी राजश्री छत्रपति स्वामी स्वारी करून कर्नाटक प्रांती गेलियावरी तिकडे जमाव लस्कर चालीस हजार व हाषम एक लाक पचविस हाजार जमाव जाला आहे दुसरे हि आणखी जमाव होत च आहे प्रतिकूल पुड पालेकर तमाम येऊन भेटले आहेती जमेती पोख्त जाली आहे तूर्त स्वार पंधरा हाजार व हाषम पंचवीस हाजार देऊन रवाना केले आहेती ते हि साखल प्रात तुंगभद्रेचा तिरास आले आहे खजाना हि एक लाख होण्याबरोबर आहे यास आणावयास राजश्री धनाजी जाधव व राजश्री संताजी घोरपडे सेना पच्यसहश्री पाठविले आहेती ते हि आठा पंधरा दिवसी येतील ते आलियावरी तो जमाव व हुजूरचा जमाव ऐसे करून त्यास पाठऊन प्राते स्वारी होईल तरी हे पत्र तुह्मास सादर केले असे तेणेप्रमाणे जमावानिसी सावध असणे त्या प्राते आलियावरी तुमची हि सरजामी मो। रतनोजी सिंदे व शंकराजी ढगे ये हि रदबदल केली त्याप्रमाणे चालऊ बि॥
तैनात सालिना होण्या गाव
५०० खासा ४ इजाती
५०० मताजी जेधे २ वेतनात गाव
-----------
१०००
सदरहूप्रो हाजार होनु तैनाती व इजाती व मुकासा मिळून साहा गाव यभाग जाली देऊ तरी तुह्मी आपली खातरनिशा राखने स्वामीच्या पायासी एकनिष्ठता धरून स्वामिकार्य साध्य होय ते गोस्ट करणे गनिमाचा हिसाब काय आहे तुह्मी लोक जेव्हा मनावरी धरिता तेव्हा गनीम तो काय आहे गनीमसा तुह्मी लोकी केला आहे ते तुह्मी च लोक या राज्याची पोटतिडिक धरता तेव्हा आवरंगजेबाचा हिसाब धरीत नाही असे बरे समजोन लिहिण्याप्रमाणे वर्तणूक करणे अवरंगजेबाने ह्मराष्टलोक आहेती त्यास मुसलमान करावे असे केले आहे त्या पो। मुसलमान केले मो। नेतोजी राजे व साबाजी घाटगे व जानोजी राजे व कितेक ब्राह्मण हि या प्रातीचे बाटविले दुसरे मतलब गेले आहेती तिकडून तमाम बाटले लोक होते ते आपले जमावानसी आह्माकडे येताती हाली हणमतराऊ निंबालकर व सटवोजी निंबालकर व बाजे सरदार आले आहेती दुसरे हि कितेक येताती ऐसे गनिमाचे लस्कर आटोन हुजूर जमाव होत आहे ईश्वर करीतो तरी फत्ते च आहे लिहिलेप्रमाणे हिमती धरणे जाणिजे छ २० जमादिलाखर सु। तिसैन अलफ आज्ञाप्रमाण मोर्तब (मर्यादेय विराजते)
सदरहू मोर्तब सिका चौकटी