लेखांक २५२
श्री
तपोनिधी आनंदगिरी महंत यास प्रति राजश्री राजा शिव छत्रपती उपरी तुह्मी पत्र पाठविले ते प्रविष्ट जाले भवानगिरी याणी मौजे इडमिडे येथे बाकीचा तगादा लाविला आहे परतु बाकीचा बयान पाहाता गयाल मयत जलीत आहे याकरिता स्वामीनी गावास कौल देऊन रयत सुखरूप राहे उपसर्ग न लागे ऐसे केले पाहिजे ह्मणून लिहिले ते विदित जाले ऐसीयास भवानगिरी याचे मते गांवाकडे बाकी आहे आणि तुमचे मते त्याणी बाकी काहाडिली आहे गलतथ आहे ऐसे तुमच्या लिहिल्यावरून कळो आले याकरिता ये गोष्टीचे वर्तमान मनास आणायानिमित्य भवानगिरी याचा शिष्य हुजूर आणविला आहे तुह्मी आपला शिष्य पाठऊन देणे स्वामी मनास आणून जे आज्ञा करणे ते करितील हाली तुमच्या लिहिल्यावरून गावास कौल सादर केला आहे तो देऊन कीर्द करवणे बहुत काय लिहिणे