लेखांक १४९
श्री १६०९ श्रावण वद्य १०
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक १४ प्रभवनाम संवत्सरे श्रावण बहुल दशमी सोमवासरे क्षत्रिय कुलावतस सिहासनाधीश्वर श्री राजा शभु छत्रपती स्वामी याणी राजश्री येसाजी मलार देशाधिकारी व देशलेखक प्रांत वाई यांसि आज्ञा केली ऐसी जे मठ श्री सदानंद गोसावी मो। कसबे निंब प्रा। वाई यासि मठमजकुरी अनछत्राबदल ऐवज पेशजी कैलासवासी स्वामीच्या वेळेपासून चालिला आहे स्वामीनेही तेण्हेप्रो ऐवज द्यावयाची आज्ञा केली होती परंतु सांप्रत कारकून पाववावयास हैगै करितात ह्मणून राजश्री आनंदगिरी गोसावी मो। मठमजकूर याणी लिहिले त्यावरून कळो आले तरी पहिलेपासून अनछत्र चालिले असता मधे ऐवजाबाबे कुसूर करावया काय गरज याउपरी तर्ही ऐवज पाववावया बाबे सुस्ती न करणे पहिलेपासून द्यावयाचा मोईन असेल तेण्हेप्रो पाववीत जाऊन अनछत्र चालो देणे धर्मकार्यास खलेल न करणे जाणिजे अनछत्राचा मामला पूर्वीपासून ता। सालगुदस्ता चालिला असेल ते मनास आणून त्याप्रमाणे चालवणे उजूर न करणे लेखनालंकार
सुरुसुद बार