लेखांक ४२
श्री १६१६ मार्गशीर्ष शुध्द १३
माहाराज राजाधीश राजश्री
छत्रपती स्वामीचे सेवेसी
विनंतिपत्र सेवक तिमाजी यमाजी सुभेदार व कारकून सुभा प्रात सातारा सेवेसी कृतानेक विज्ञापना विनंति एथील क्षेम ता। छ ११ रबिलाखर पावेतो स्वामीचे कृपादृष्टीकरून सुभेमजकूरचे वर्तमान यथास्थित असे
दा। स्वामीने माहादजी जगदळे यांवरी कृपाळू होऊन मसूर तर्फेची देसमुखी त्यांचे दुमाला करुन आज्ञापत्रे पाठविलीं त्याप्रमाणे राजश्री पंतअमात्य एही दुमाला करुन याचे हाते देसमुखीचे प्रयोजन घेत असता त्याउपरि यादवानी हुजरून देसमुखीची पत्रे आणिली त्यावरून राजश्री पतअमात्य याणी व राजश्री सताजी घोरपडे सेनापती यानी गोत मिळऊन मनास आणणे म्हणून माहालकरी यास पत्र पाठविले त्यावरून मसूर व तारगाव तर्फेचे हवालदार मजमदारी गावगन्नाचे पाटील चौगले गावगन्नाचे कुल गोत मिळऊन श्रीकृष्णेमध्ये घातले जे मसूर तर्फेचे तुमचे कोण देसमुख देसमुखी जगदळेची की यादवाची त्यावरून गावगन्नाचे पाटील श्रीकृष्णेमध्ये रिघोन सत्य स्मरोन गोही दिल्ही ते स्थळीं साक्षपत्र करून दिले ते व माहालचे हवालदारांची बखेर ऐसी घेऊन माहादजी जगदळे स्वामीचे सेवेसी आले आहेत मनास आणून पारपत्य करणार स्वामी धणी मायबाप आहेत सेवेसी विदित होय हे विनंति