लेखांक ३
श्री
हकीकत माहादजी वलद सुलतानजी जगदळे देसमूख परगणे मजकूर कदीम देसमुखी प्रा। कर्हाडाबाद व पा। मसूर एथील देसमुखी कदीम होती वडील भाऊ जगदेराऊ याचे वाटणी कर्हाड व धाकटा भाऊ रामोजी याचे वाटणीचे मसूर दो हि परगण्याची देसमुखी दोघे भाऊ करीत असता वडील भाऊ जगदेराऊ यामधे व कर्हाडीचा नैबामधे काही बोलीचाली होऊन कुसर पडला त्याने जगदेरायास दड बाधला ते देवयास ताकती नाही मग जगदेराऊ पळोन गेला नैबाने कुल बिसादी लुटून खालसा केली जगदेरायास हरामखोरी लावून देसमुखी अमानत केली बखेर पादशाहास लेहून, अमानत करून, नेगोजी थोरात उबराव याचे दुमाला केली हा वजीर पादशाही चाकर होता याच्या तनख्यात दिल्ही मसूर परगणाची देसमुखी देह सत्तावन आपले वडील करीत होते जगदेराऊ बाहीर दावे करीता मरोन गेला त्याचे पोटी सतान नाही मग आपला वडील रामोजी व त्याचा लेक दयाजी हे बादूर पादशाहापासी फिराद जाहाले हजरत पादशाहानी हकीकत मनास आणिली तेव्हा पेसकसी दाहा हजार होन माथा ठेऊन कर्हाडीची देसमुखी कदीम होती ऐसे मनास आणून दुमाला केली पेसकसीचे पैसे द्यावयास मौसर नाही ह्मणऊन आऊध तरफेचे देहे २७ सत्तावीस लुखजी कुकजी यादव पादशाही मनसफदार होते त्यास सत्तावीस गावीची देसमुखी देऊन, त्यापासी पैसे घेऊन, पेसकसी फेडिली त्यावेरी थोरातामधे व आपल्या वडिलामधे दावा लागला तेव्हा मागती आपले वडील हजूर विज्यापुरास गेले हुजूर नागोजी व बहिरजी नाहवी याचे अडिनाव यादव हे होते यावेरी पादशाहीची मेहेरबानी होती मग त्याची पाठी करून च्यारी गावीची त्यास देसमुखी दिल्ही कडेगाऊ १ कोरेगाऊ १ टेबू १ गोवारे १ ऐसे च्यारी गाव प्रा। मजकुरीचे देऊन, त्याची पाठी करून, थोराताचा दावा दूर केला त्याउपरी रताजी रुपाजी यादव यानी आउधीची देसमुखी करून पुडावे केले बणगोजी मुधोजीस मिळोन मुलखामधे राजीक केले आणि वणगोजी मुधोजीस आणून कर्हाडीचा कोट त्यास घेऊन दिल्हा मोठेमोठे सावकार लुटिले पनाळापावेतो राजीक केले ते वख्ती वणगोजी मुधोजी पुड जाहाले होते त्याची सनद कर्हाडीचे देसमुखीची करून घेतली तेव्हा यादवामधे व आमच्या वडिलामधे दावा पडला मग आपला अजा बादूर पादशाहापासी फिराद जाहाला पादशाहानी रताजी रूपाजी बहूत तलब केला ते हजूर न येत मग त्यावेरी नामजादी करून रताजी रूपाजी जिवे मारिले ते वख्ती देसमुखी अमानत करून रणदुल्लाखान याचे हवाला केली मसूर परगणाची देसमुखी देहे सत्तावन गावीची चालत होती याउपरी निजामशाहीतून शाहाजी राजे भोसले हे विज्यापुरास आले पादशाहानी मनसफ दिल्ही ते वख्ती यादवाचे भाऊबद शाहाजीराजाकडे चाकर होते त्यानी शाहाजीराजास मिळोन देसमुखीचा करीना सागितला जे, जगदळाच्या घारामधे कोणी नाही, जगदळाचे घर मोडिले आहे, कर्हाडची देसमुखी आपल्याकडे केली पाहिजे, त्याचा आमचा दावा आहे ऐसे सागितले मग शाहाजीराजानी पादशाहास अर्ज करून दौलतेचे भरीस देसमुखी कर्हाडची मागोन घेतली मग आपला आजा नरसोजी हा मसूरपरगणाची देसमुखी व कसबाची पटेलगी आपला वडील करीत असता, शाहाजीराजे भोसले यास यादव मिळोन देसमुखी कर्हाडीची शाहाजीराजाकडे कला ते वर्तमान आयकोन करनाटकामधे बेगरुळास आपला आजा नरसोजी जगदळा गेला