पत्रांक ८०
श्री
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तात्या स्वामी गोसावी यांसी
पोष्य त्रिंबक सदाशिव कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लेखन केलें पा। विशेष इकडील वर्तमान तर हैदरनाईक जडेहणवटीवर छावणी करून आहे श्रीमंत फौजसुद्धां मुदगल सरकारांत जावें चार रुाो मिळवावें या उद्देशें सावनुराकडून निघून आठदहा मजली पुढें आले गोपाळराव गोविंद रखवालीस सावनूरच्या ठेवले सावनुरकर नबाब समागमें च आहे मुरारराव दौलतराव बराबर च आहेत इतक्यांत हैदरनाइकानें संधी पाहून कूच करून बंकापुरास आला सावनूर घ्यावें या उद्देशें आला गोपाळरायानीं शहरची बंदोबस्ती चांगली च करून आहेत सावनुरास पठाण वगैरे माणूस पांच सात हजार चांगले च आहे गोपाळराव हि चांगले च शहराबाहेर येऊन उभे राहात मग हैदरनाइकाचे लोकांनी सांगितलें कीं किल्यावर चालून गेल्यास परिणाम ठीक नाहीं मग दगा करावयासीं वोढ्यांत दबा धरून बसला गोपाळराव पुढे सरले म्हणजे गाठावें दगा करावा हें वर्तमान त्यास कळलियावर हे हि थबकून राहिले श्रीमंतांस ताबडतोब लिहून पाठविलें कीं लौकर फौजसुद्धां यावे यानीं हि रोख फिरविला माघारें कूच केलें मग हैदरनाइकास कळलियावर कूच करून जडेहणवटीवर गेला गोपाळराव तेथें च आहेत नारो शंकराची फौज तेथे पाठवली आहे रास्ते यांची फौज विठ्ठल शिवदेव खासा सावनूरच्या आसपास मदतीस आहेत श्रीमंत गजेंद्रगडास आले दाणापाणी पाहून राहतात महागाई लष्करांत फार आहे याप्रमाणें वर्तमान आहे राजकारणसूत्र अद्यापि कांहीं नाहीं मग पाहावें माधवराव मूळवेदीच्या वेथेनें वारले असें येथे वर्तमान नाहे सत्य मित्थ ईश्वर जाणें जगन्नाथ धोंडाजीचीं पत्रें दोन चार आम्हांस आलीं होतीं कळावें आबा पुरंधराभोवते चौकी ठोवितात हरबा सासवडी आहेत पाईचे माणूस दोनचार हजार ठेवितात आबा हशमनीस सासवडी आहेत हशम ठेवितात पुरंधराभोवते गांव होते तेथे ताकीद करून वोस करविले बाजार भरूं नये ऐशी ताकीद केली आहे आपुण खासा वाड्याबाहेर जात नाहींत वाड्याचा बंदोबस्त करितात लकडी कोट वाड्यांत घालितात असें वर्तमान ऐकतों गडकरी हि आपले बंदोबस्तानें आहेत श्रीमंत दादा पुण्यास आलियावर काय होईल पाहावें आबाला दादानीं बोलाऊ पाठविलें आहे जात नाहींत आबाचा शिवबादादाकडे पाठविला आहे काय मतलब असेल न कळे तुम्हास काशीदाबरोबर मुजरद सविस्तर लिहून पाठविलें आहे कळेल सारांश येथें मुद्याचा प्रकार कांहींसुद्धां नाहीं उमेद निर्फळ आमचा द्वेष फार च सकारनामक करितों पुरंधरचें निमित्य सकारनामक आम्हांवर आणितात किती सोसावें घरी असतों वरकड मा।र रुबरू दर्शनांतीं च बोलावयाचा पत्रीं लिहितां नये चिरंजीव सासवडीं पावला तुम्हांस पत्र पाठविलें च असेल चिंतो अनंत तेथे आले असतील आमचीं गाव खेडीं सोडावीं ऐशीं पत्रें सखारामाचीं रायानीं घेऊन आपलीं हि दादास पाठविली आहेत मग तेथें चिंतोबा काय बोलतोकरितो ईश्वरी सत्ता कळलें पा। लोभ असे दिजे हे विनंति.