पत्रांक ७९
श्री
राजश्री गोविंदपंत तात्या स्वामी गो
विनंति उपरि लष्करांत भेट जाहाली तुळजापुरास जातो म्हणून निरोप घेऊन यात्रा करून आलों लष्करांत लोक रवाना केले येथें महिनापंधरा दिवस राहून तिकडे आपली भेट होईल असें होतें तो एकाएकीं पुरंधरची गडबड जाहाली त्याजवरून अम्हांस किल्याचा वसवास पडला तेथील बंदोबस्त करावा या अर्थे जैतापुरीं जाऊन बंदोबस्त केला माघारे आलों येथे प्रजन्य बहुत तिकडे यावें त्यास श्रीमंतांच्या मर्जीचा प्रकार कसा हें कांहीं कळत नाहीं रामचंद्रजीनीं दरबारीं प्रकार मात्र एकदां लिहिला विशेष कळत नाहीं आपण लिहितील हें मनांत होतें परंतु दोन महिन्यांत पत्र न आलें तेव्हां हुजूर जासूद आपल्याकडे पाठविला आहे तिकडील अर्थ कर्नाटकांतील प्रकार काय कसा पुढें काय विचार तें ल्याहावें आम्हीं येथें येतां च पत्र पाठवावें परंतु तिकडे यावें असें होतें तिकडे येण्यास गडबडीमुळें न घडलें आपण दरबारी आहेत तेव्हां सल्ला बरावाईट आम्हांस स्मरण करून लिहितील हें मनांत आणून वाट पाहिली अन्याबा भेटले त्यांस हि आलों हे कळलें होतें परंतु आपण काल पत्र पाठविलें हा हि प्रकार कळावा व आम्हांकडील खासगत प्रकार कळावा यास्तव पत्र पाठविलें आहे श्रीमंताची हि पत्रोत्तरें येणें म्हणोन आली आहेत त्या च प्रकारांत आहों बहुत काय लिहिणे हे विनंति