पत्रांक ७८
श्रीशंकर
राजश्री गोविंद शिवराम तात्या स्वामीचे सेवेसीं
विनंति उपरि काल भेट व्हावी याभावें चिटी पा। होती परंतु त्वरे करितां आपण निघोन त्रिंबकास गेला सविस्तर लिहून पाठवावें या भावें लि।। त्यास केवळ फुकट परमार्थबुद्धी करून आम्ही बारा वर्षे चाकरीत असलों तर च लता गाडा असता मग दुसरेयाची दर्द जाणोन समजोन चालवणें करणें हें या कालीं दूर च आहे केवळ जरूर प्रकार जाले पाहिजेत त्या गोष्टीविशीं युक्तीनें समय पाहून कार्य होईल तसें तसें करून घेतलें पाहिजे आमचेविशीं तुम्हीं जपून लागू होऊन करून घ्यावें तुमचे विशी आम्हीं जपावें यावेगळी मंडळी आहे तीस तुमचे आमचे कार्याचें किती अगत्य आहे तो प्रकार कळत च आहे आमचे पदरीं संसार भारी सरंजामाचीं खेडीं ती दोन वर्षे लुटून खराब करून टाकिलीं एक टोंकडे तो माहाल सारे खानदेशांतील म्हारवडा येणाराजाणारानें लुटावा ही गत त्याची एक म्हसवें बारा गावाचें तें भिकार माहालमात्र उदीरखेड्याजवळ घोड्यापिढयास सत्तेस एकूण सारे पंधराहजार यंदा आकार वीस हजार परमसीमा आमचे पागेस निराळा ऐवज सरकारांतून घोडी करार करून दहा हजार रुपये प्रतिवर्षी व नक्त सरंजामाची नेमणूक सालाबाद पंचवीस हजार जुने डोलसुद्धां व मामलतींत वीस हजार पावीत होते दरबार रुजू तेव्हां एकंदर बेरीज पंचावन्न साठ हजार रुपये नक्त सरंजाम खेड्याखेरीज पावीत होते बरें तितके नाहींत तर निम्मे तरी या कालानुरूप पावतील तर संसार चालोन सेवा घडेल श्रीमंतांचे पदरी आहों नावलौकिक आहे तो कांहीं सुटत नाहीं आमचें श्रीमंतांवाचून दुसरा कोणी चालविणार आहे की त्यास पुसावें आम्हीं कायावाग्मनसा श्रीमंतांचे चरणाशीं एकनिष्ठ जालों तरी आम्हास मात्र पोटाची भ्रांत पडावी ज्याणीं दौलत पालथा घातली त्याणीं सरंजाम बारापधरा लक्षाचे याप्रा। सर्वानीं खाऊन खावंदास कोठें ठिकाण नाहींसें जालें तरी ते च गोड वाटावे ऐसें च असल्यास पुढें तरी फल काय होणार कळत च आहे यास्तव कृपा करून चालविणें पाठ थोपटून सेवा घेणें तर धांदरफळ शिलेदारास दिल्हें कोतुल परगणा वगैरे ज्यांस दिल्ही आहेत त्यापरीस आम्ही सेवा करून दाखऊं आम्हांवर कृपा करून पंचवीस हजाराचा सरंजाम एक स्थळ कालदेशाचे निभावणीस द्यावें आमचे घोड्यास गवताची काडी मिळेना पागेस रो होता तो हि दरमाहा तीनशें ते तूर्त पावत नाहींत पन्नास वर्षाचा मोकासा हजार बाराशें ऐवज तो खानदेशांत गाव तो देखील बंद ऐसें अवघ्यांपेक्षां एक आम्ही च नावडते असलों तर सारी उमेद आज च पुरली ऐसें समजोन सोडीत सोडीत संसार सोडून देशांतरास जाऊं जे दौलतेचे उपयोगी इतबारी हिंदु असतील ते च सर्वस्वे दौलत खाऊन असतील इतकें लिहिण्याचे प्रयोजन नाहीं परंतु कालहरण न होय कर्ज घेऊन दिवाळखोरी करून संसार करावा तर ते हि अनकूल न पडे यास्तव कृपाकरून सर्व गोष्टी श्रीमंती चित्तात आणून आपलेच चित्तांत खरें लटकें विचारून पाहावें आणि आज्ञा करावी जरूर जरूर सर्व अर्थ विदित करणें कृपा करणें पदरी बाळगणें उचित असे इतक्यापुर्ती सेवा हि करून दाखऊं उमेद फार आहे परंतु समयकाल नाहीं हे विनंति.