पत्रांक ७७
श्री
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदपंत तात्या स्वामीचे सेवेसी पोष्य नारो गंगाधर साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल छ १३ मोहरम मु गजेंद्रगड आपल्ये कृपें इकडील यस्थास्थित असे विशेष आपण पत्र पाठऊन सांभाळ करीत नाहीं हें उचित कीं काय दाटीमुळें स्मरण नसेल तर नसो वरकड रिणानबंध प्राचीन असा नाहीं सदैव पत्रद्वारें आनंदवावें श्रीमंतांची छावणीं या प्रांती जाहालियाचें वर्तमान आपणास विस्तारें कळलें च आहे सांप्रत राजश्री गोपाळराव यांस फौजसुद्धां व दीड हजार गाडदी असे सावनुरास ठेविले रास्ते विठ्ठलपंत शाबाजी भोसले नवलगुंद तालुक्यांत ठेविले आणि खासास्वारी देखील घोरपडे व पठाण सावनूरकरसुद्धां दोन महिने पोट भरावें म्हणोन मुदगल सरकारांत जावयाकरितां सिदनूर पावतों आले तीस हजार खंडणी केली पुढें खंडण्या करीत करीत गदवले पावेतों जावें असा प्रकार होता परंतु हैदरनाईक एकाकी च बंकापुरास आला सावनूरच्या गळा पडणार असे धमकेनें आला म्हणोन गोपाळरायाचें पत्र श्रीमंतास आलें त्याजवरून माघारें गजेंद्रगडास आले हे माघारे फिरल्याची आवाई जातां च तो माघारा हनगळास गेला म्हणोन काल वर्तमान आलें आहे याउपरि काय वर्तमान होईल ते लिहून मागाहून पाठऊं तुमची घोडीं गोपाळरायाजवळ सुखरूप अस्थिचर्ममात्र काळानुरूप आहेत तात्या यंदाची मुलुकगिरी या देशाची फार भारी पडली सरकारांत पैसा नाहीं लोकांस विसादिशी आठवडा माहागाई घोडीं उंटे बहुत मेलीं पथक्यांचे लोक अवघे उठोन गेले चहू हजाराचा सरदार पांच सातशें याप्रमाणें आहे हुजुरात कांहीं बाहीं दम खाऊन आहे पुढें श्रीकृपेकडून सोई पडल्यावर अवघें बरें च आहे तूर्त महर्गता मोठी वरकड मजकूर विशेष कोणता ल्याहावा इकड एक च छावणीचें काम देशी मोठीं मोठीं कामें जाबसाल तिकडे पडतात सर्वदा पत्रद्वारा सुचवावा या सैन्यांत आपले कोणी आहेत असें समजत असावें कृपा केली पाहिजे हे विनंति