पत्रांक ७५
श्री
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तात्या स्वामी गोसावी यांसी
पोष्य त्रिंबक सदाशिव कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। ज्येष्ठ वद्य पंचमी मुक्काम नजीक कोपळ येथें असें विशेष तुम्हांस पांच सात पत्रें पाठविलीं ती पावलीं हें कांही कळत नाहीं तुमची पत्रें आम्हांस चारपांच पावलीं श्रीमंतरायानीं तुम्हांस पत्रें पाठविली तीं पावतीं उत्तरे पाठवावी इकडे हवा फार जहाल लष्करचे हत्ती पंधरासोळा मेले घोडीं मरतात माहागाई मोठी असा प्रकार आहे मोगलाचें हैदरनाइकाचें राजकारण आहे माधवराव गेले च आहेत बिघाड जाहालासा दिसतो तेथें काय वर्तमान हिंदुस्थानचे वगैरे ल्याहावें तात्या भेट होईल लौकर तर फार उत्तम आहे चिंता लागली आहे या छावणीची मोठी फजिती ईश्वर आब राखो लोभ असो दीजे हे
विनंति१