पत्रांक ७४
श्री
राजश्री मामा स्वामी गोसावी यांसी व राजश्री तात्या स्वामी गोसावी यांसी
विनंति उपरि आपण पत्र पाठविलें तें पावन बहुत संतोष जाहलो सातारियाचे फडणीस सबनीस गैर वाका समजाऊन तेथें श्रीमंतांनीं नेले होते बेहेडा दूर करावा ही घालमेल करणार होते त्यास सर्व प्रकार येथे श्रीमंतांनी केला बेहेडा त्याप्रों तेथे मुख्यास समजून चित्तांत आणून देऊन केला कारभार फिरऊं नये ऐसें केलें त्यावरून बहुत संतोष जाहाला श्रीमंत बहुत समाधान पावले तुम्ही असलियावर जेथवर बाजू संभाळणें तें येथील लक्षाप्रमाणें संभाळाल च कालगत विचित्र कीं चांगली गोष्ट इतबारी सेवकानीं सांगावी ते चित्तांत न यावी वरकडाच्या विपरीत गोष्टीं तथापि तें च उत्तम मानावें असें होतें तेव्हां ईश्वराचे चित्तांत तमाशे पाहणें येनें असो इलाज नाहीं वरकड पुरंदरचा मार लिहिला ऐश्यास येथील संकेतानें हा प्रकार किमपि न जाहाला कोळीबेरड स्थाई कदीम तिशा वर्षांचे चाकर त्यांस दूर करून अन्नास यजित केलें यासाठीं त्यानीं दावा पाहून हें कर्म केले येथील मर्जीत एकमर्जीवर च कायम आहे वरकड दुष्ट लोक नानाप्रकारें तेथें विकल्प आणून देतील तरी इलाज नाहीं परंतु सत्य गोष्ट अशी आहे सविस्तर राजश्री गोविंदरावजी सांगतां कळेल छावणी जाहाली पुढें ईश्वरी सत्ता प्रमाण आपला आमचा आतां दुसरा प्रकार तिळमात्र नाहीं हें मनोमन साक्ष असे विस्तार काय ल्याहावा लोभ असो दीजे हे विनंति चिरंजीव बजूस घरास पाठऊन दिल्हा हे विनंति राजश्री आबा व राजश्री मोरोबा यांस नमस्कार