पत्रांक ७२
श्री
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव तात्यो स्वामीचे शेवेशी पो बाळाजी जनार्दन सां नमस्कार विनंति उपर येथील कुशल ता। छ ७ जिल्हेज पावेतों वर्तमान यथास्थित असे विशेष तुम्हांस पूर्वी दोनतीन पत्रें पाठविलीं परंतु एका हि पत्राचें उत्तर न पाठविलेंत असो निरंतर पत्र पाठवीत जावें श्रीमंतांची आशा नसतां मध्ये च लबाडी करून श्रीमंतांचें नांव करून पुरंधर किल्ला घेतला हे लष्करांतून पत्रें आलीं तेव्हां निश्चय जाहाला असो प्रस्तुत श्रीमंत दादासाहेबांचें मनांत कितेक प्रकारे संशय वाढत चालले पुढें बखेडा मातबर व्हावा असे हि डौल दिसतात त्यास तुम्हीं तेथें आहा संशयाची निवृत्ती वरचेवर करून राखीत जावें पाहाते अर्थी उभयता श्रीमंतांचे हि मनांत कांहीं नाहीं परंतु मध्ये च क्षुल्लक आहेत ते मात्र उपदव्याप करून नानाप्रकारें संशय घालून कलह वाढवावा या करतां तुम्हांस सूचना लिहिले आहे बहुत काय लिहिणें लोभ असो दाजे हे विनंति.*