पत्रांक ७१
श्री
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसीं पोष्य मोरो बाबूराव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीये लेखन केलें पाहिजे विशेष तुम्हांकडील सांप्रत पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं तरी सदैव पत्र पाठवीत गेलें पाहिजे यानंतर इकडील वर्तमान तरी हैदरनाईक हनगळावर आहे दिवसेंदिवस फौज कमी होत चालली राजकारणें हि बहुतांची लागली आहेत कोणा थरास जाईल पाहावें तुम्हांकडील पत्रें येथें आलीं माहादजी शिंदे याची सरदारी काढून मानाजी शिंदे यास सांगितली कारभारी माहादाजी गोविंद केले श्रीमंतांची मर्जी त्याणीं च रक्षिली त्याचें फल हि पावले व पावतील तुम्हीं तेथें आला तरी उभयता श्रीमंतांची मर्जी रक्षे असें बोलणें बोलावें कोणा हि कारभारांत अग्रेसर न व्हावें कारभाराचे धनी दुसरे आपण रामाय स्वस्ति रावणाय स्वस्ति या न्यायेंकरून राहावें तुम्हांस आम्हीं ल्याहावे असें नाहीं राजश्री मामा व आपण तेथें आहेत आपणास ल्याहावें असें नाहीं बहुत काय लिहिणे कृपालोभ कीजे हे विनंति