पत्रांक ६९
श्री
राजश्री गोविंद शिवराम स्वामी गो
विनंति उपारि चिरंजीवास सविस्तर पत्रें पाठविलीं आहेत त्याजवरून कळेल तुम्हीं चिरंजीवास योग्य दिसेल ते विनंति करीत जाणें किरकोळ कामाविषई येथून गृहस्त जातात त्यास साहित्यपत्रें द्यावीं लागतात तीं हि अगत्या अगत्यें देतो त्या प्रमाणें चिरंजीवानी चालवावें कोठें मनसुबीचें काम असल्यास मनसुबी पंचाइती करून करवावी वरकड किरकोळ कामास दिक्कत घेऊं नयेत येथें विचार करून च देणें ते देतों किल्लेजातचे बेहेडे करून दादो उद्धव यास चौकशीस पाठविले आहेत ते चौकशी करून ऐवज मागावयास तुमचे मारफतीने चिरंजीवाजवळ येतील त्यास ऐवज पावता व्हावा व हिकडील मनसुब्यास उपयोग पडे तें च एक वर्ष करावें हिकडे कमाविसदार व सरदार यांस व सरंजामी यांस खावंदगिरी कशी असते चाकरी कशी हें पुर्ते ठाऊक नाहीं ठाऊक कांहीं असेल परंतु विसरले आहेत फार करून पोरें च आहेत नवी च साळ आहे एक मल्हारजी होळकर मात्र जुना आहे त्यास सर्व ठाऊक आहे जो पहिल्या प्रमाणें च वर्तेल पहिले पासून त्याची भीड तीर्थरूप चालवीत आले त्या प्रमाणें आम्ही हि चालऊं परंतु लहानथोर चाकर, व कमाविसदार मल्हारबाची च रीत धरील तर कसें पुरवेल परिछिन्न पारपत्य करावें लागेल सारांश आम्ही रगडून कारभार करितों तीर्थरूपा प्रों बलकी थोडेसे अधीक च नरम करितों यांचा मजकूर काय आहे बंदोबस्त केलियानें दरसाल एक करोड रुपयाचा नफा कमाविसदार व सरंजामी यामध्यें निघेल मोडलें तरी हिंदुस्थान आहे मुख्य चिरंजीवाचा व आमचा एक विचार असल्यानें हिंदुस्थान व कर्नाटक दोन्ही बंदोबस्त पहिलेपेक्षां अधीक होतील ये विशीचे अर्थ वारंवार तुम्हीं चिरंजीवासीं व तुम्हाशीं बोललों च आहों तुम्हीं स्मरण वरचेवर देत जाणें एक वर्ष आमची कुमक ऐवजानें व पत्रांनी केली यानें किती मुलूक सुटतो काय बंदोबस्त होतो चाकर नरम होतात ते दृष्टीस पडेल चिरंजीवांनीं पागा व फौज न पाठविली रिकामी घरीं बसली यानें इतकी शिबंदी आंगावर पडली मनसुबा हि कांहीं जाला नाहीं ऐसें आम्हास सुचतें तुम्हास कळेल त्या प्रा। विनंति करणें पुढें होणें जाणें ईश्वराधीन आहे.
नक्कल अस्सलबमोजिब रावसाहेब यांजकडे रा। वा। १४ बा। एकोजी जासूद जेथे वाघोजी नाईक रा। वर्ष प्रतिपदा मु।। इछावर प्रा। माळवा हे विनंति