पत्रांक ६७
श्री.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदपंत तात्या स्वामी गोसावी यांसी
पो। त्रिंबकराव सदाशिव कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ२५ जमादिलावल नजीक बंकापूर यथास्थित जाणोन स्वकीयें कुशल लेखन केलें पाहिजे विशेष आपल्याकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं तर पत्र पाठवून संतोषवीत असिलें पाहिजे यानंतर खंडोजी जगन्नाथ आम्हाशीं फारच बाकोन आहेत आम्हांजवळ राहात होते ते आतां राहात नाहींत आम्हाशीं वांकडें राहावयाचें कारण की श्रीमंत तैनात जाजती करीनात ती आम्ही जाजती करवावी ही कल्पना चित्तांत धरून आम्हांकडे येत जात नाहींत आपल्यास कळावें आमचा इलाज जितका होता तितका आम्हीं गोपाळराव मोरोबा दादा बाळकोबा हरीपंत फडके रामचंद्र गणेश इतक्यांकडून आम्हीं रायासीं रदबदल करविली आम्ही केली ती ऐकेनात शेवटीं हजार रुपये जाजती एकाएकास केले तथापि खंडोजीबावाचे मनास नये आम्हीं काय करावें आणि आम्हांस च वेडेंवांकडे बोलतात आम्हीं सोसतों कांहीं वाईट बोलत नाहीं तुम्ही म्हणाल कीं नाना जलद उतावळी करून रागें भरले असतील तरी तात्या आमचा उतावळी जलदी दोष गुण बळवंतरायानें सोसलीं तुम्हीं सोसलीं सोशिता वरकड आमचें कोणी चालू देणार नाहीं आम्ही हि कोणास कांहीं म्हणत नाहीं असे रीतीने आहों परंतु खंडोजीबावानी आम्हावर फार च केली या गोष्टीस वर्ते लिहिले गृहस्त साक्ष आहेत राणू हगवणा तेथे आला तो आम्हांस न पुसतां आला म्हणून पत्र पाठविलें नाहीं राणू हि हा मजकूर सांगेल बरें त्याचे चित्तास येईल तें करोत आम्ही तिळमात्र वाईटबरें म्हणत नाहीं असें आहे तुमची भेट होईल कीं नाहीं तुम्ही या प्रांते येणार किंवा नाहीं हे सर्व बारीक मोठे वर्तमान लिहून पाठवावें चितोडी घोडी नारोपंतास देऊं कळावें हंहप्पाबरोबर पत्रें पाठविलीं ती पावलीं असतील लोभ असो दीजे हे विनंति
अपत्ये अप्पाचे साष्टांगनमस्कार