पत्रांक ६६
पो छ ८ जिल्काद श्रीगणराज
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसीं पोष्य मोरो बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लेखन केलें पाहिजे विशेष आपण राजश्री जयरामपंताबरोबर पत्र पाठविलें तें पावलें लिहिला मजकूर कळला ऐवजाचा मजकूर ऐसिन्यास जोगीनीं निकड केली म्हणून त्यास दिल्हा आपण निकड न केली म्हणून न दिल्हा असा अर्थ नाहीं आम्ही आपला निरोप घेऊन आलों तेसई आपण कांहीं मा। सांगितला होता यास्तव अनमान जाला कदाचित् आपणास विस्मरण जालें असेल तरी नकळे असो आतां जयरामपंतास ठेऊन घेतलें आहे अखेरसालीं थोडाबहुत ऐवज पावता होईल आम्ही मिरजेस आलों सैन्य प्रस्तुत गलगनाथाकडे गेलें ती।। मातोश्रीबाईस बरें वाटत नाहीं यास्तव येथें आलों प्रस्तुत कांहींसा उतार आहे आठा दिवशीं सैन्यांत जाणार सालमजकूर छावणी जालियाणें हैदरनाईकाचे पारपत्य होईल कदाचित् छावणी जाली नाहीं तरी कृष्णतीरपर्यंत त्याची च सत्ता जाणावी प्रस्तुत तो बिदनुरी आहे मीरफैजुला हानगळापाशी आहे बंकापूर धारवाड दोनीं सज्य करून ठाणीं बसलीं आहेत परंतु पारपत्य ने जालें तरी घेतली नाहींसारखीं त्याजपाशीं वीसहजार गाडदी आठ हजार फौज इतकें सामान व तोफा शंभरपर्यंत आहेत झाडी सोडीत नाहीं हरपनहळ्ळी चित्रदुर्ग येथें कांहीं साधेल या आशेवर गलगनाथपाशीं गेले आहेत यजमानाची कृपा पूर्ववत आहे कारभारी हि प्रतिवर्षाप्रों कृपा करितात आम्ही कांहीं व्यंग दाखवीत नाहीं कालानुसार वर्तणूक करितों तीर्थरूप राजश्री दादास हलसिंगीचे हल्लेस जखम पट्याची शिरावर लागली होती उत्तम प्रकारें बरी जाली पाणीं घेतलें आपणास कळावें बहुत काय लिहिणें लोभ असो दीजे हे विनंति