पत्रांक ६५
श्री
पु।। राजश्री गोविंदपंत गोसावी यांसी
दंडवत विनंति उपार इकडील मजकूर लि।। आहे वरकड हि येथून आपलेपरी लिहीत आहेत यामध्यें आमचें लक्ष श्रीमंतांच्या पायाशी एकनिष्ठ आहे त्याचें नुकसान न व्हावें म्हणून सरळपणें मान-सन्मान कोणेविशी न पाहतां रात्रंदिवस मेहनत केली आणि श्रीमंतांच्या पुण्येंकरून सर्वास यश आलें ते च चाल यंदाच्या स्वारीस येऊन मनसबा केला तो च शेवटास लागला असता तरी इतके संकट न पडतें पैका हि मिळत होता आणि तह पडत होता परंतु करणारानीं छीळछद्म करून उभयतामध्यें बिघड पाडून रा। विसाजीपंतास मिळोन इतके प्रकार केले असो जे जसें करितील तसें फळ हि होईल परंतु आम्हांकडील दरबारचा कामकाजाचा सर्व भरवंसा आपला आहे वकील केले त्याणीं येथें नानाप्रकारें मनसबे रचले दरबारी त्याचे पुत्र आहेत ते हि त्याचे आज्ञेप्रमाणें च वर्तत असतील आम्हांस कांहीं दरबारचें वर्तमान कळत नाहीं इतके दिवस जाले त्याचेकडून पत्राची उत्तरें न आली आमचें वर्तमान तेथें न कळे त्याजकडील आम्हांस न कळे तेव्हां वकिलाचें करणें लि।। काय समजावें एक वर्ष जालें आमच्या लष्करांतून रा।। विसाजीपंताजवळ जाऊन पाहिलें आम्हांकडील लक्ष सोडिलें आम्हीं रीतीच्या वाटे सांगत असतां त्याच्या विचारास न ये ते मोठा खेळांत जाऊन पडिले असो तेथे हि श्रीमंतांचे कार्य होत असेल त्याचा अर्थ आमच्या लक्षांत राहावें ऐसें नाहीं कोणेविशीं जाबसालांत भरवंसा पडत नाहीं याजमुळें सांप्रत कैलासवासी सुभेदार याजपासून तुमचा स्नेह च चालत आहे त्याप्रमाणें आम्हांसी हि लोभ च केला सर्व कामकाज निर्गम करून इकडे रवाना केले आम्हास हि स्नेहाची ममतेची जोड दरबारांत एक आपली च आहे या अर्थी तेथील कामाचा काजाचा जाबसालाचा करण्याचा अर्थ आपल्याकडे च आहे दुसरे आम्ही जाणत नाहीं सर्व जाबसाल आपणच करीत जावा जालें वर्तमान रा। केसोपंत याजला आपल्याजवळ ठेऊन त्याजकडून आठवे दिवशीं वर्तमान ल्याहावयास सांगत जावे येथून हि वरचेवर जालें वर्तमान लि।। जाऊं म्हणजे दरोबस्त सर्व अर्थ समजत जातील अतःपर दुसरियाच्या भरवंशियावर न जावें आपण च इकडील अर्थ मनन करून बोलणे ते बोलून लिहिणें अर्थ ते लिहिवीत जावे दुस-या पत्राची वाट न पाहावी छीळछिद्म बहुत जालें आहे भरवसा एक आपल्या शि।। आम्हांस कोणाचा पडत नाहीं ऐसें पाहून हाली लिहिलें असे रो। छ ४ साबान हे विनंति