पत्रांक ६४
श्री
सेवेसीं त्रिंबक सदाशिव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील वर्तमान ता। आषाढ शुद्ध चतुर्दशीपर्यंत स्वामीचे कृपेंकरून यथास्तित असे विशेष बहुता दिवशीं स्मरण सेवकाचें होऊन कृपाळू होऊन आज्ञापत्र पाठविलें तें पाहून चरणाचे दर्शनतुल्ये आनंद वाटला स्वामीचे पदरचे आहों कृपा करणार स्वामी समर्थ आहेत खासास्वारी लवकर च येईल जानोजी भोसले गाइकवाड निंबाळकर तमाम सरदार फौजसुद्धां बोलाविले आहेत हैदरनाइकाचे पारपत्य पुरतें च होईल व येविशीं सेवकास कृपोत्तरे आज्ञा केली त्यास स्वामी पुण्यवान प्रतापी आहेत अशाचा मजकूर तो किती आहे सर्व हि स्वामीचे पादाक्रांत आहेत स्वतेजप्रकाशेंकरून शत्रूचे निर्दाळण शीघ्रकाळें च होईल स्वामीचे पाय दृष्टीस पडतील तो दिवस आनंदाचा आहे सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापन