पत्रांक ५५
श्रीगणराज शके १९८६
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसीं पे।। गोपाळराव गोविंद कृतानेक नमस्कर विनंति उपरी येथील कुशल ता। वैशाख वद्य अष्टमीं बुधवासर मो। केरोर तालुके सावनूर वर्तमान यथास्थित जाणोन स्वकीयें कुशल लिहीत असलें पाहिजे विशेष आपणाकडील बहुत दिवस पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं हें उचित कीं काय तरी सविस्तर लिहून पाठवावें इकडील वर्तमान तर श्रीमंत तुम्हांस पत्रें वरचेवरीं पाठवितात त्याजवरून कळत च असेल श्रीमंतांची व हैदरनाइकाची वैशाख शुद्ध द्वितीयेस गांठ पडली तो चार कोस गोट सोडून आला होता तेथे दोन प्रहरापासून तोफा तोफाचा मार फार जाहाला शेवट दोन घटका दिवसास हुजरातीची वगैरे हल्ला जाहाली होती परंतु कारीगार जाहाली नाहीं रात्रौ चौकीस राहावें म्हणजे सहजांत काम होईल म्हणोन आम्ही सांगोन पाठविलें परंतु कोणाचे खातरेस आलें नाहीं गोटास गेले तो आपल्या गोटास गेला रात्रींचा कोंडला असता तरी सापडता तदोत्तर हि दोन तीनदां तोफां तोफांची जुजें जोहालीं त्याच्या गोटावर तोफा लाविल्यानीं त्यानीं माणूसघोडें त्याजकडील फार जाया होऊ लागलें व पहिल्या दिवशीं त्याजकडील हजार घोडींमाणसे जागची ठार जाहाली हिकडील शंभर पावेतों घोडेंमाणूस ठार जखमी जाहालीं नित्य तोफाचा मार न सोसवे तेव्हां रात्रीं कूच करून पळाले बारीच्या आंत जाऊन मायनहळ्ळी जवळ झाडीच्या आस-यास राहिला तिकडे एक दोन वेळा सड्या फौजानिशी गेलों परंतु अडचण व पर्जन्य फार तळीं कालवे फार यास्तव कारगरी जाहली नाहीं सल्ल्याचा संदर्भ अगोदर आला होता तेव्हां अगदीं च बुडवावाशी उमेदीमुळें राजकारण तोडिलें तदोत्तर हिकडून याणीं होऊन राजकारण लाविलें तें बळावलें नाहीं अद्याप अंत्र तुटलें नाहीं कदाचित् जाहाला तरी उत्तम कांहीं पैका देऊन तालुका सरकारचा सोडून देणार तह जहाला तरी छावणी करावीसें म्हणतात शेवट मनसबा सिद्धीस जाईल तो खरा मासुराजवळा मारे फार जाहाले दाणा वैरणीचा तोटा यास्तव केरुरावर कूच करून आले अमवाशा पावेतों काय तो ठराव होईल तदोत्तर छावणी अथवा देशास येणें हा प्रकार कळेल तोपर्यंत चार दिवस काळ घालवावा असा मनसबा योजिला आहे बहुत काय लिहिणें लोभ असो दीजे हे विनंति
सेवक शिवाजी बाबाजी सां नमस्कार लोभ कीजे हे विनंति