पत्रांक ५४
श्री.
राजश्री तात्या स्वामी गोसावी यांसी
पोष्य त्रिंबक सदाशिव सां नमस्कार विनंति उपरि अलीकडे पत्रें फार दिवस सविस्तर येत नाहीं ऐसें नसावें सर्व मा। कच्चापक्का लिहिला पाहिजे इकडे श्रीमंत येतात न येतात ल्याहावें खंडोजीबावा आल्यावर फार च रुष्ट होऊन निराळे जाऊन राहिले आम्ही कांहीं चुकलों नाहीं विस्तार लिहिणें काय आम्हीं पूर्वी हि जाहालें तें बरे च केलें सांप्रत होईल तें करूं न होय यास आम्हीं काय करावें परंतु त्याणीं फार च सीमा केली असो कळावें श्रीमंत धारवाड घेऊन हानगळास आले ठाणें घेतलें शत्रू येथून सा कोसावर आहे राजकारण हि आहे पाहावें काय होईल तें भेटी कधी होईल हे इच्छा आहे रा। मार्गशीर्ष शुद्ध षष्टी हे विनंति