पत्रांक ५०
पे।। छ ९ जिल्काद श्री
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदपंत तात्या स्वामी गोसावी
यांसी पो त्रिंबकराव सदाशिव कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ १० सवाल मु।। रायहुबळी यथास्तित जाणोन स्वकीयें कुशल लेखन करीत असिलें पाहिजे विशेष आपल्याकडील पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं तरी पत्रीं संतोषवीत असिले पाहिजे विशेष सरकारच्या खिजमतगाराबराबर एकदोन पत्रें पाठविलीं तीं पावलीं असतील च श्रीमंतांनीं मनोळीचे ठाणें घेऊन धारवाड एकीकडे टाकोन राय हुबळीवरी आले तोफा लाविल्या एक रोज हल्ला केली ते हल्लेमध्यें धनसिंग पागेवरील गोळी लागोन ठार जाहाला रो। रामचंद्र गणेश यास डाव्या हातास गोळीची जखम लागली वरकड हि शेंदीडशें माणूस जखमी जाहालें साठपाऊणशें ठार जाहालें मग दुसरे दिवशीं ठाणें हस्तगत जाहालें येथून आज कूच करून पुढे पांचसा कोसावरी जाणार तेथून सावनूरच्या सुमारें जातील हैदरनाईक इकडें पुढें आला आहे त्या मुक्कामाहून त्यास यांस चौवीस कोसाचें अंतर आहे पुढें होईल वर्तमान हें लिहून कळऊं तुमची घोडी सुखरूप आहेत घोडियांच्या ऐवजविशीं राजश्री गोपाळराव यांसी बोललो आहे त्यानीं करार केला आहे कीं अखेर साल पावेतों निमे रुपये पावते होतील याप्रमाणें बोलिले आहेत कळावें वरकड फार बोलून स्वारांचा निकाल करवावा तरी बोलणें नाहीं मग बोलून निर्फळ जयरामपंत आहेत नित्य नमस्कार करीत आहेत आपल्याकडील वर्तमान लिहीत जावें पत्र फार दिवस येत नाहीं चिंता वाटते लोभ असो दीजे हे विनंति
राजश्री वाटवे रामराम