पत्रांक ४८
श्रीगणराज
राजश्री मामा व राजश्री तात्या स्वामी गोसावी यांसी
पोष्य त्रिंबक सदाशिव व गोपाळराव गोविंद सां नमस्कार विनंति उपरि तुम्हीं पत्रें सोळावे जिल्कादचीं पाठविलीं तीं चौथें जिल्हेजीं मुळगुंदास पावलीं सविस्तर कळलें संतोष जाहाला पुरंदरचा प्रकार जाहाला याची कल्पना येथे नानाप्रकारें होती त्यास तथ्य वर्तमान सविस्तर ल्याहावें म्हणोन लिहिलें त्यास हा प्रकार येथून संकेतानें जाहाला नाहीं हे प्रमाण आहे कोळीबेरड बाहेर घातले कोठें त्यांस थार नाहींशी जाहाली याजकरितां त्याणीं किल्ला घेतला त्यांचें लक्ष उभयतां श्रीमंताखेरीज दुसरे ठाईं नाहीं असें आहे याखेरीज विपरीतभाव आणणार आणतील तर इलाज नाहीं विसाजीपंत धोंडोबाअप्पाकडील किल्यावर गेला आहे यासाठीं मशारनिलेचें नांव बद्दू जाहालें आहे परंतु शोध पाहातां विसाजीपंत धोंडोबा अप्पाकडून दोन-तीन वर्षे दूर आहेत ते यांचे आज्ञेशिवाय कोळ्याबेरडांत मिळाले आहेत याप्रमाणें वर्तआहे येथून श्रीमंतीं ताकिदी किल्ल्यास दिल्ह्या आहेत साहित्यपत्रें दिल्हीं आहेत की किल्ला ज्याचे त्याचे स्वाधीन करणें याप्रमाणें मजकूर आहे तेथील श्रीमंताचे मर्जीप्रमाणें वर्तणूक करावी हेच येथील मानस आहे वडीलपणें सर्वमनसबा दूरंदेश ध्यानांत पाहाणें आणणें हा भार बरावाईट तेथें च आहे व असावा इतकें मात्र मनांतील वरकड कृष्ण कल्पना कोणी घेऊन चित्तांत आणून देतील तरी इलाज नाहीं वरकड प्रसंगानुरूप विनंति करणें ते करीतच आहों वरकड नवल विशेष लिहिणेंसें नाहीं अधिकोत्तर असल्यास लिहूं बहुतकाय लिहिणें लोभ असो दीजे हे विनंति