पत्रांक ४५
श्री.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तात्या स्वामी गोसावी यांसी
पोष्य त्रिंबक सदाशिव व मोरो बाबूराव कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लेखन केलें पाहिजे विशेष तुम्हीं पत्रें पाठविलीं तीं पावोन परम उल्हास जाहाला या च प्रकारें सदैव कुशलार्थ लिहून संतोषवीत असावें इनामगांवच्या पत्राविशीं लिहिलें व कुरणाचा मजकूर लिहिला त्यावरून श्रीमंतास विनंति करून ध्यानांत आणून दिल्हें त्याउपरि तुम्हांस पत्र लिहून दिल्हें आहे तें पाठविलें आहे त्यावरून कळेल सारांश गुता नाहीं पत्रें देतील हें पत्र च सनदेप्रमाणें आहे तुम्हीं हि भाद्रपद अखेर याल आलियावर पत्राचा हि प्रकार होईल इकडील वर्तमान तर हैदरनाइकाकडील बोलीचा प्रकार लागला आहे ठराव होईलसे दिसतें या मासांत निकाल पडेलसे दिसतें माहादशेटीचे मार्फतीनें राजकारण आहे राजश्री गोपाळराव दादा सावनुरास होते ते इकडे बोलाविले आहेत विठ्ठल शिवदेव तेथें जाऊन राहिले आहेत गोपाळरायासीं ऐवजाचा मजकूर बोलून जें होईल तें कारतों राजश्री मोरोबाआबासीं बोललों आहें त्याणी सांगितलें कीं या गोष्टीची काळजी आहे दादा आल्यावर थोडीबहुत तजवीज करितों असे बोलले आहेत आम्ही हि सर्वप्रकार त्यांसीं बोललों त्यास गोपाळराव आल्यावर कांहीं विल्हे लागावेसे आहे तेथें तुम्हीं येथील श्रीमंताचे लक्षाप्रमाणें मुख्याची मर्जी कायम राखलीत येणेंकरून यजमान तुमचे ठाई बहुत कृपायुक्त आहेत आम्हास हि याजहून विशेष दुसरें नाहीं वरचेवर वर्तमान लिहीत जावें नारोपंत पोंकशे यास समागमें आणावें बहुत काय लिहिणे कृपालोभ असों दीजे हे विनंति