पत्रांक ४१
श्री.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसीं
पे।। बापूजी महादेव साष्टांग दंडवत विनंति येथील कुशल ता। छ १ शवाल जाणोन स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे विशेष आपण स्मरण करून कृपापुरस्कर पत्र पाठविलें तें पावोन, बहुत आनंद जाहाला राजश्री नाना याचे लग्नाचा निश्चय केल्याचा मजकूर लिहिला तो कळला त्यास अतीउत्कर्ष संतोष जाहाला कार्यसिद्धी उरकोन घ्यावी श्रीमंत हरिहरेश्वरचें दर्शन करून माघारा फिरले कळावें बहत काय लिहिणें लोभ कीजे हे विनंति