पत्रांक १८
श्री
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तात्या स्वामीं गोसावी यांसि
पोष्य त्रिंबक सदाशिव कृतानेक नमस्कार विनंति उपर येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लेखन केले पाहिजे विशेष तुमचीं पत्रें दोन तीन आलीं सविस्तर अवगत होऊन बहुत आनंद जाहला तेथील प्रकार सर्व लिहिले ते कळले तुमचें पत्र च श्रीमंतांस गाठून एकांतीं वाचून दाखविलें उत्तर कसें लिहूं म्हणून विनंति केली उत्तर केलें नाहीं तात्या या मर्जीचे प्रकार कसे सांगावे प्रसन्नता चित्त एकंदर नाहीं चिरंचीव बजू येथें आहे त्यासी कधीं बोलावावें हा प्रकार नाहीं मग जेवणखाणाची सय जाणत च आहां याप्रकारें आम्हांसी चौपाचा रोजा सहजांत उगे च स्मरण जाहालें तरी बोलावितात किंवा स्वारीत चालते वेळेस जवळ बोलावितात कारभाराची गोष्ट मनसबा विचार पुसत नाहींत सांगत नाहींत आम्हीं मध्यें असें करीत होतों कीं न बोलावितां जावें बोलावें वर्तमान सांगावें कांहीं पुसावें असें महिना दोन महिने केले परंतु मळमळित प्रकार च दिसूं लागला चांगले आर्त धरून बोलावें सांगावें हें नाहीं याचवरून चित्त उदास राहातें जुंजाचे दिवशीं मेहनत पुढें होऊन करावयाची ते केली सखाराम च होते त्यांस सोडलें नाहीं गोळ्याचा मार व गोळीचा मार खाऊन उभे होतों असो कोण पुसतो आहे. रायापाशीं आम्ही जातों येतों याजवरून सकारनामकांनीं वाईट मानलें चर्चा हि केली आम्हांसी ठीक नाहींत आमचें काम येथें आलियावर मुतालकीच्या वर्षासनाच्या चिठ्यामात्र दिल्ह्या व शिरवळचें कुरण चार दिवस आमचीं कुरणें सुटत तोंवर दिल्हें आहे वरकड कामकाज तिकडे आलियावर होईल हा आशिर्वाद आहे दुसरें एक काम तुम्हीं शहरचे तळावर रायास हटकलें होतें पुण्यास गेल्यावर करून देईन म्हटलें होतें तें मात्र जाहालें नीट समजा उलगडून पत्रीं लिहितां नये तुम्हांकडे तीन चार पत्रें आमचीं गेलीं पावलीं न पावलीं हे ल्याहावें म्हणजे संशय दूर होतील सौभाग्यवतीस तेथें आणिलीत पांड्स आणलें उत्तम केलेंत श्रीमंतांनीं उत्तर लिहिलें आहे त्याजवरून कळेल आम्हांस सांगितलें कीं तुम्हीं तात्यास ल्याहा कीं तुमचेविशीं दुसरा प्रकार नाहीं सविस्तर लिहित जाणें तीर्थरूपांची मर्जी राखीत जाणें असें ल्याहावें म्हणून सांगितलें ती चिटी च तुम्हांकडे पाठविली आहे आबाकडील मजकूर तरीं नारो आप्पाजी कृष्णराव पारसनीस यांचे विद्यमानचा करार आहे की घेतला वसूल द्यावा त्यांत पुरंदरचे खंडणीचे पट्टीचे रु।। बारा हजार आम्हीं द्यावे असें करारांत असतां लटकें बोलून निघून गेले गतवर्षीचे व यंदाचें वर्ष दोन वर्षांचा वसूल घेतला आहे चौघांनी सांगावें तें ऐकावें हा करारमदार असतां असें लटकें बोलावें तमाम गांव लुटलें गवतें नेलीं कापलीं दाणे नेले नेत च आहेत सर्व मृषा कारभार जेव्हां श्रीमंत दादास चित्तांत आमचे ठाई कृपा येईल तेव्हां ध्यानांत येईल मग होणे तें होईल नाहीं तर कांहीं होत नाहीं लबाडी किती सोसावी तिकडे आल्यावर होणें तें होऊं तुम्हीं हा मजकूर दादासीं बोलावयाचें जाहालें तर बोलावा हे विनंति रा। वैशाख शुद्ध पूर्णिमा मु।। रटेहळ्ळी प्रांत सावनूर हैदरनाईक मायनेहाळ्ळीस झाडींत गेला श्रीमंत फौजा सड्या करून भोवताले जाणार छावणी होईल कीं काय कळेना लष्करांत महागाई फार आहे निजामअल्ली कृष्णातीरास येणार असें वर्तमान आहे हे विनंति