पत्रांक १६
पे।। छ ५ बिलावल श्री शके १६८६
राजश्रिया विराजत राजमान्य राजश्री तात्या स्वामी गोसावी यांसि
पोष्य त्रिंबक सदाशिव कृतानेक नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लेखन केलें पाहिजे विशेष तुमचीं पत्रें पावलीं सविस्तर कळलें कुरणाविसी लिहिलें त्यावरून श्रीमंतांस विनंति केली त्याचीं उत्तरें दोन पाठविलीं आहेत पावलीं असतील सारांश तुमची कुरणें खासगत खडकवासलें बावधन हीं कुळाकडे करार राखिलीं आहेत अण्णाकडील पांच कुरणें पैकीं तीन सरकाराकडे घेतलीं दोन अण्णाकडे पाषाणाचें व कुड्डुच्यांचें राखिलें तीन कुरणें सरकारांत घेतलीं त्यांचा मोबदला अंबी नाणेमावळची येथील दिल्हे आहे असें नेमणुकेंत लिहिलें आहे त्यास तिन्ही कुरणें जीं घेतलीं तीं तूर्त कारभारियांचे मर्जीस्तव देतां नये असें बोलण्यांत आहे पुढें तजविजीनें होईल असें बोलतात त्यास लिहिल्या प्रों कुरणें जीं राखलीं आहेत हीं हि चालतात किंवा अटकाव आहे हे नीट उमजून ल्याहावें म्हणजे ताकिदी पाठऊन देऊं तुमची पागा हिंदुस्थानांतून आली आहे त्यास बरी आहे ऐशास येथें द्वारकोजी निंबाळकर याजकडे बोली म्हणाल तर होत आहे तीनशे रुपये निवळ शेरानालबंदी तिजाई शंभर याप्रमाणें आहे जर सोईस येत असेल तरी पागा तयार करून भाद्रपद अखेर पाठवणें लिहिल्या प्रा। निकाल करून घेऊन येऊं गोपाळरावाकडे ऐवजाविशीं फार बोललों शेवट असा प्रकार तूर्त तीस हजार देवितात मंगळवेढ्यावर चिटी वीस हजार आश्विनमासीं देतात बाकीं मार्गशीर्षमासीं देऊं म्हणतात राजश्री परशरामाकडील पंचवीस तो देतो असें आहे बहुत निकडीचे प्रकार गोपाळरावांस बोललों परंतु त्याचा ही शेवटाल जाबसाल हा आहे याचें उत्तर पाठवणें जो वसूल येईल तो घेतों इकडील वर्तमान तर हैदरनाइकाकडील राजकारण सलुखाचें होतें आज दीडमहिना घोळले शेवट लबाड कारभार तो सल्ला करीत नाहीं साफ याप्रमाणें जाहालें या उपरि श्रीमंत दादासाहेब लवकर येतील पारिपत्य होईल मजकूर काय आहे परंतु तूर्त असा प्रकार आहे महादजी शिंदे हिंदुस्थानांत गेले दहा बारा हजार फौज जमा आहे मल्हारबा ते एक जाहाले पुढें जबरदस्ती पाडावी असें आहे हें वर्तमान तुम्हांस तेथें कळत च आहे क-हाडाकडे माहुलीकडे भूमिकंप जाहाला हे वर्तमान तुम्हांस कळलें असेल च वरकड वर्तमान यथास्थित आहे आम्हीं नवी घोडी साडेपांचशा रुपयास एक विकत घेतली कां घेतली म्हणाल तरी पांच घोडे थोरले च लष्करांत येथें मेले म्हणून घेतली तुमच्या पागेंतील भीमा घोडी रोग होऊन मेली वरकड सारी पागा बरी आहे. जयरामपंत चाकरी चुकरी चांगली करितो बारगिरानीं कामकाज चांगलें केलें चार घोडीं हैदरनाइकाकडील आणली शेंदोनों गुरे आणलीं बरें आहे कर्ज हा कालवर केलें नाहीं आम्हीं एक गाय जयरामपंतापासून चांगली आपल्यास आणिली तुम्हास समजावें तुमचे येणें कधीं होइल हें ल्याहावें राजश्री नारोपंत पाळंदे यांचे लेकास लग्नसमई घोडी दिल्ही नाहीं देऊ केली आहे त्यास मुलाजोगी घोडी चांगली तुम्ही तिकडे पागेंतून एक द्यावी सावनुरांत होते ते आले कळावें रा।। श्रावण वद्य दशमी मु।। नजीक कितूर लोभ असो दीजे हे विनंति
स्नेहांकित अंगोजी जगथाव रामराम