पत्रांक १४
पे।। छ २८ जिल्हेज सु।। इसन्ने सबैन श्री माघ वा ६ श. १६९३
दंडवत विनंति उपरि इकडील लढाईचा मजकूर आलाहिदा पत्रीं लिहिला आहे त्यावरून कळेल लढाईचे अगोदर वद्य पंचमीस रात्रौ राजश्री विसाजीपंत आमचे डेरियासी येऊन लढाईची मसलत पुसली आम्ही ही त्याचे च मनोदयानरूप मसलत देऊन दुसरे दिवशी षष्टीस प्रातःकाळी दरोबस्त फौजेनिशी तयार होऊन गंगांचे घांटावर गेलो आपले मिसलीस जा + + + + + ही विशी आपले तर्फेने कमी न कारतां अथाक पाणियांत घोडे जिनासुद्धां घालोन गंगा ऊतरून उत्तर तिरीं येऊन रोहिल्याची फौज मारून गर्द केली चार सरदार मातबर तितके आमचे जागे होते ते कराकरा आणून अंबा-यांसुद्धां हत्ती निशाणें बाण जंबुरे नौबती लूट आणली स्वामिसेवेंत यवच्छक्ति अंतर न केलें असें असोन राजश्री विसाजीपंत व शिंदे पहिलेपासून येक त्यामुळें शिंदे पंतमशारनिलेस भरोभरी देत गेले आणि श्रीमंतांस पत्रें पाठविलीं आणि हाल्ली हि लिहिण्यासीं कमी करीत नाहींत उभयतांच्या लिहिल्यावरून श्रीमंतांची मर्जी कळेल त्यास आमचे तर्फेनें स्वामिसेवेंत अंतर कोणे हि गोष्टीचें होणें नसे आपण प्रसंगोपात विनंतीस न चुकावें अवघे एक फक्त आम्हीं मात्र च वेगळे त्यामुळें एकाचें लिहिणें खावंदास प्रमाण कसें वाटेल सर्व गोष्टी परिणामीं निदर्शनास येतील अस्तु दरबारी आमचे तर्फेचे आपण आहेत कल विकल सांभाळ + + + + + लिहीत गेलों पुढे होईल तो हि लेहून पाठऊं आम्हांस भरवसा एक आपला असे
रा। छ १९ जिलकाद बहुत काय लिहिणे लोभ असो दीजे हे विनंती