पत्रांक ११
श्री
राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचे सेवेसी
पोष्य बाळाजी जनार्दन साष्टांग नमस्कार विनंति रसदेविशीं श्रीमंतांचे पत्र पाठविलें हें बहुतम उत्तम जाहालें सनद आपले नावें देवितों रसदेची मात्र तयारी करवावी धोंडोपंतास मामलत सांगावी म्हणोन श्रीमंतांचें पत्र तुम्हांस व आम्हांस आलें आहे येथील कारभारियाचे चित्तांत सर्वथैव नाहीं नानाप्रकारें उपपत्ती आणितात यास्तव श्रीमंतांस विनंति करून धोंडोपंतास च मामलत सांगणे असे पत्र घेऊन लौकर पाठवावें अवधूतराव लाख रुपये देतो धोडोपंत हि द्यावयास कबूल आहेत चेहळदूसुद्धां मग गुंता काय श्रीमंतांनी येथील श्रीमंतांस हि विनंति करावी म्हणोन लिहिलें च आहे व आपलें चेहळदूस हि ठीक पडेल जरूर पत्र पाठवावें बहुत काय लिहिणें कृपा करावी हे विनंति