पत्रांक ६
श्री.
चिरंजीव राजश्री राव यासि रघुनाथ बाजीराव आशिर्वाद उपार येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें विशेष आपण दोन पत्रें पाठविलीं तीं पोहचलीं माधवराव दिनकर यास पाठविलें तो पावल ऐसियास याचें वर्तमान मना आणून चौकशीचे रीतीने त्याजकडे अन्याय लागल्यास आपलेकडे पाठवून देतों माधवराव लबाड तो आहे च यांत गुंता नाहीं बाळाजी वामन दामले याजकडे पो। अकोले येथील तनकरा निघाला आहे त्याची चौकशी करून त्याजकडे जे रुपये निघतील ते घेऊन त्यास इकडे पाठवून द्यावे चौकशी चांगली करावी माधवराव दिनकराने पहिल्यानें च फारखती दाखविल्या सबब हा खरासा वाटला होता आपण आणविला म्हणोन पाठविला त्यास गाडद्यांचे स्वाधीन केलें हें ऐकोन आपणास रगडून लिहिले आपण माघारा पाठविला व त्याणें सरकारांत मुचलका दिल्हा तो हि पाठविला ऐसियासि त्याचें बोलणें पाहातां प्रमाणिकसें दिसत नाहीं लबाड आहे च गुदस्ता हि याणें च लटकी वरात करून विकली होती तें ठिकाणी लागलें तेव्हां मार हि दिल्हा होता या हि कारभारांत लबाडी असेल यास्तव येथें थोडीशी चवकशी करून लबाडी दिसल्यास आपणाकडे पाठवितों आपण पुर्ती चवकशी करावी पारपत्य हि करावें परंतु बिसनशिंगाचा हि कारभार लबाडीचा आहे आपण चौकशी करितील च आपणास ल्याहावेंसे नाहीं आमच्यापेक्षां आपली चौकशी अधिक आहे बाळू दामल्याकडे चोरी लावली हे अपूर्व च आहे पुर्ती चौकशी करून रुपये घ्यावें व एथें पाठवावा एथेंहि शासन होईल तोफखानियाचा हिशेब घ्यावयाचा आहे हे आशिर्वाद