पत्रांक ५
श्री.
श्रीमंत राजश्री गोविंदराव तात्या स्वामीचें सेवेसी
पोष्य नारो गंगाधर व हरि बल्लाळ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल ता। छ १८ मोहरम मु।। नजीक गजेंद्रगड आपले कृपेंकरून सुखरूप असो विशेष आपणांकडून बहुत दिवस पत्र येऊन परामर्ष होत नाहीं तेणेंकडून चित्त सचिंत्य आहे तर ऐसें नसावें सदैव पत्रीं कुशलवृत्त लिहून संतोषवीत असावें आपलीं पत्रें येथें हमेशा सर्वांस येतात त्यास एका हि पत्रांत आमचे स्मरण न जालें तस्मात आम्ही शेरामधीं पडिलों असें दिसोन येतें इकडील वर्तमान तर श्रीमंतास श्रीमंत लिहितात त्यावरून कळत च असेल हैदर नाईक सावनुरा पलीकडे साकोस छपरबंदी करून छावणी करून राहिला श्रीमंत मुदगल सरकाराकडे गेले होते त्यास हैदर नाईक सावनुरास येतो निकड करून घेणार असें वर्तमान येतां च माघारे फिरोन गजेंद्रगडपर्यंत आले पुढें दरमजल जावें तर बातमी आली जे बंकापुरास आला होता परंतु माघारे फिरल्याची बातमी येतां च माघारा फिरोन लिहिल्या ठिकाणीं छावणी केली जमियत आहे त्यांतील राउत व पायदळ फुटोन येतें कोणी मनावर धरून हें च काम करितील तर या च तजविजेनें दसरापर्यंत अर्धा सहजांत होतो परंतु तसें होत नाहीं काहीं काहीं होतें आपले फौजेचें वर्तमान तर चाळीसपर्यंत चैत्र वैशाखमासी होती आतां पंधरा राहिली आहे पंचवीस उठोन देशास गेली लष्करांत महर्गता दोन पायली दीड पायलीची धारण नेहेमीं च आहे ज्या दिवशीं एखादा गांव मोडावा त्या दिवशीं तीन चार पाइली होतात महर्गतेमुंळे लोक बहुत हैराण जाले हुजरातचे लोकांस निम्मे नालबंदी पावली निमें लोकांस कांहीं च नाहीं एक वर्ष चाकरीचें जाहालें दुसरें लागलें पैसा नाहीं काय माणसानें करावें परंतु आपलें इमान राखोन लोक आहेत पैक्याचा तोटा पुढें हंगामशीर देशीहून फौज आली तर सर्व हि ठीक च होईल याप्रों। इकडील वर्तमान आहे पुढें होईल तें लिहून पाठवूं तिकडील वर्तमान सदैव लिहित जावें श्रीमंत राजश्री दादासाहेब फौज तोफखाना घेऊन इकडे कधीं येणार हें लिहून पाठवावें तात्या आमचें विस्मरण न व्हावें आम्हांस शे-याच्या लोकांत न घालावें आम्हीं पहिल्यापासून तुमच्या लोभाची वांच्छा करितों आपण हि त्याचप्रकारें ममता अंतःकरणापासून करित आले त्याचप्रकारें दिनप्रति वृद्धि व्हावी सारांश आपले कृपेचे असो तिकडील वर्तमानें नाना प्रकारचीं आइकतों तत्वता कांहीं च कळत नाहीं तर सर्वदा स्वकीय परिच्छिन्न अर्थविस्तारें ल्याहावयास आज्ञा करावी बहुत काय लिहिणें कृपा केली पाहिजे हे विनंति राजश्री नारोपंत दाजी पोंकशे स्वामीस सा।। नमस्कार प्रविष्ट करावे हे विनंति