पत्रांक १५७.
इ. स. १७५३ ता. २८ ऑक्टोबर श्री. कार्तिक शुद्ध २ शके १६७५.
नक्कल.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नारे शंकर गोसावी यांसिः-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान, नमस्कार उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें. विशेष. मौजे सातपूर प्रा। नाशिक येथील कमाविशी सालमजकुरी तुम्हांस सांगतली असे. तरी मौजेमजकुरची कमाविष इमानें इतबारें करित जाणें मौजेमजकूरचा तनखा रुपये ९०० नवशें याशीं हाल वसूल रुपये एकविशें यासी बितपशील.
१००० जहागीर सरदेशमुखी, चौथाई, मोकाशी व बाबती ऐवज निका तपशील.
७०० जागीरदार
३०० मोकाशी.
---------
१०००
११०० तुम्हास संवसाराचे बेगमीस ज्यास्ती तैनात घ्यावे घास-दाणा व फर्मास व वाटबेगार तुम्हीं घ्यावी.
१३१। सरदेशमुखी वसूल रुपये एकविसें दरसद्दे रुपये १२॥ रुपये दोनशें साडे बासष्ट पैकीं तुम्हांस माफ केले. निम्मे मोकदमीबदल रुपये १३१॥ बाकी निमे सरकारांत घ्यावे.
------------
२२३१।
येणें-प्रमाणें २२३१। रुपयाची नेमणूक करून दिल्ही असे. सदर्हूपेक्षां धरण बांधणार; धरण बांधून गांवची लावणी करून ज्यास्ती आकार होईल तो धरणास जो पैका लागेल तो फिटे तों पावेतों जो ज्यास्ती पैका होईल तो धरणाकडे द्यावा. धरणाचा पैका फिटल्यावर ज्यास्ती आकाराचा ऐवज निम्मे सरकारांत द्यावा. निम्मे तुम्हांस बक्षीस द्यावा ऐसा करार केला असे. जाणिजे. छ १ माहे मोहरम सु।। अर्या खमसैन मया अलफ बहुत काय लिहिणें.