पत्रांक १०६.
१७६७ ता. ११ सप्तंबर. श्री. १६८९ भाद्रपद वद्य ३.
श्रीमंत राजेश्री तात्या स्वामीचे शेवेसीः—
आज्ञाधारक देशमुख व देशपांडे पा। सेवगांव साष्टांग नमस्कार विनंति, येथील ता। छ १७ रा।खर पावेतों स्वामीचे कृपा अवलोकनेंकरून सेवकानें यथास्थित असे विशेष. पा।गणे मजकुरीं श्रीमंत साहेबी कबूतरा बा। पट्टी पेशजीची बाकी शहाजादी याची, तो ऐन सरकारांत घ्यावासा जाला. त्यावरून आज्ञा जाली कीं, पट्टी करून देणें. राजश्री नारो बाबाजी सुभेदार याजकडे तहशील सांगितली. त्यावरून दुतर्फा जाहागिरदार सिंदे व होळकर याजकडील तहशील वसूल जाली. तनखा दर शेकडा बत्तीसप्रमाणें घेतलें. श्रीमंत राजश्री बापूसाहेबाचे जागिरीचें गांव तो ऐवज गांवगन्ना यानें देविला नाही. सबब कीं तमाम कच्चा अंमल त्यांचा. पन्नास हजाराची वांटणी त्याजकडील. गांवतनखा दरशेकडा बावीसप्रमाणें, त्यांनीं राजश्री यशवंतराव गंगाधर याजकडे आपणापासून दिधले. गांवबगाव तहशील करूं दिधली नाहीं. त्यांनीं आपणापासून दिधले. स्वामीकडील गावचें काम पट्टीचे राजेश्री राघोपंतबाबापाशीं विल्हे लाऊन दिधले. पंतांनीं बहूत रदबदल सक्त केली. समर्थाचें काम; आमचा उपाय काय? त्यांच्या संतोषास आलें त्याप्रमाणें दर शेकडा एकोणीसाप्रमाणें करार करून दिधला. बरें, समर्थाच्या पायाची जोड आहे. आम्हांस संकटांतून पार करणार आपण माहेत. सारांश, धन्यांनीं आमचे गरिबीवर दृष्टी देऊन स्थापना केली, हा निर्वाह करणार आपण समर्थ आहेत. बहूत काय लिहिणें. कृपा निरंतर असों द्यावी हे विज्ञाप्ती. गांवचा हिशेब व शिवाय परगणे अलाहिदा शेवेची पाठविला असे. विज्ञापना.