पत्रांक ९६.
१७६८ ता. २९ एप्रिल. श्री. १६९० वैशाख शुद्ध १३
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजश्री १मोरो गोपाळ यांसिः-
सेवक रघुनाथ बाजीराव नमस्कार सु।। समान सितैन मया व अलफ. अनूबाई कुळकर्णी मौजे शिन्नवलि तो घोडे प्रो जुन्नर इने हुजूर विदित केलें की आपले सासरे त्रिंबक कुळकर्णी यांनी मोरो गोपाळ याचे तीनशें रुपये कर्ज घेतले होते. त्यापैकीं दोनसे रु।। कमजादा दिल्हा-बाकी शंभर रुपये अजमासें देणे राहिले आहेत. त्यास गोळ्यांनी व्याजाचे व्याज करून शंभर रुपयांचे पंधरासे रु।। केले आहेत. आणि आपले चुलतसासरे नानाजी कुळकर्णी याच्या पुत्रास नेऊन मौजेमा।।रचे कुळकर्णाचे कर्जात खरेदीखत जबरदस्तीनें करून घेतलें. याजकारितां ताकीद जाली पाहिजे म्हणून. त्यावरून येविशीं चिरंजीव राजश्री राव यांस पत्र लिहिलें आहे, तरी तुम्हीं त्यांजकडे जाणें. चिरंजीव वाजबीचे रीतीनें मनास आणवून अज्ञा करितील त्याप्रमाणें वर्तणूक करणें. जबरदस्तीनें वतन घेतलियास कार्यास येणार नाहीं. जाणिजे छ १२ जिल्हेज बहुत काय लिहिणें ?