पत्रांक ९०.
१७६७ ता २७ मे (?) श्री. १६८९ वैशाख वद्य ३० (?)
सेवेसी१ विज्ञापना. तागाईत छ २८ जिल्हेज पावेतों मुकाम देव-रायेदुर्ग येथें आपले कृपेकरून वर्तमान यथास्तीत असे. विशेष येथील वर्तमान पेशजी लेहून दोन पत्रें कासीदासमागमें नानाच्या२ रवाना केलीं आहेत. तीं पत्रें पावोन वर्तमान कळलेंच असल. त्या अलीकडील वर्तमान तरी, प्रस्तुत श्रीमंताचा बेत आपण स्वारीसमागमें असावें ऐसें होऊन आपणास यावयाविसीं पत्रें परभारा पुण्यास गेलीं आहेत. तीं पत्रें आपणापासीं येऊन पावतील. हें वर्तमान आम्हांस कळल्यानंतर आम्हीं जाऊन राजश्री हरीपंत तात्याची भेट घेऊन त्यांस भावगर्भ पुसीला. त्यास मानिलेनीं साफच सांगितले कीं ‘तुह्मी त्यास ल्याहा. दुसरा अर्थ किमपी नाहीं. स्वारीसमागमें असोन कामकाज सांगावें, ममता करावी, हाच अर्थ आहे.’ येणेंप्रमाणें त्यांनीं सांगितलें व मारनिलेनीं आपणास पत्रही याच अन्वयेंकरून लिहिलें आहे. तें पत्र बजीनस पाठविलें आहे त्याजवरून कळेल. त्यांनीं आम्हांपाशीं सांगितलें कीं “श्रीमंतासी आम्ही पक्कें करून घेतलें आहे. त्यांनीं यावें.” आम्ही “सरंजाम नाहीं. स्वारींत येणें होतें कैसें ?” हा अर्थ त्यास पुसील्यानंतर त्यांनीं सांगितले की “नाना फडणीस यास सरंजाम लागल तो, माणसे, राहुट्या, उंटें, घोडीं, वगैरे देऊन रवानगी करावी.’ येणेंप्रमाणें पत्रें घेऊन रवाना केलें आहे." येणेंप्रमाणें त्यांनी सांगितलें. सारांश मशारनिलेच्या बोलण्यांत तरी साफ आहे; आम्ही आणखी त्यास खोलून पुसिलें कीं ‘आम्हांस येणें प्राप्तच आहे. परंतु आंत-बाहेर कांहीं असिलें तरी सांगावें.’ त्यास संशयाचा अर्थ किमपी सांगितला नाहीं. त्यास येणेंप्रमाणें येथील मजकूर आहे. ऐसियासी पत्र पावल्यानंतर पुण्यास कोणी पाठवून सरंजाम आणून निघावयाची तरतूद लौकर करून स्वारीच्या रोकें यावें. लोभ करावा हे विज्ञापना. आपलें निघणें जाहाल्यानंतर पुढें पत्र रवाना करावें. त्याजप्रों वर्तमान तात्याच्या कानावरी घालूं. वरकड अर्थ भेटीनंतर सर्व सेवेसी निवेदन होतील. लोभ करावा हे विज्ञापना. २नानाचें पत्र आपणास आलें आहे त्याचें उत्तर पाठवावें हे विज्ञापना.
श्रियाविराजित राजमान्य राजश्री तात्याप्रति काशीनाथ भट्ट वैद्य कृतानेक आशिर्वाद. येथील कुशल जाणून आपलें कुशल इछितों. येथील वर्तमान रो बाळाजीपंताचे लिहिल्यावरून विदित होईल. बहुत काय लिहिणें? हे आशिर्वाद.