पत्रांक ८९.
१७६६ ता. ११ आगष्ट श्री. १६८८ श्रावण शुद्ध ६
अखंडित-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसिः –
सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीय लिहित जाणें. विशेष. ‘इकडील फौजेच्या वगैरे खबरा मनस्वी लोक १तीर्थरूपाजवळ सांगतात त्याजवरून तीर्थरूपाचे चित्तांत संशय येतो’ म्हणोन कळलें. ऐशास२ पर्जन्यकालीं पुण्यांत फौज कशास पाहिजे ? ठेऊन नफा काय ? दाहाहजार फौजेस खर्च काय पाहिजे ? तसेंच पागांचा अर्थ तर पागा खानदेश व बीड व गंगथडी वगैरे जागा सालाबाद आहेत ते घोड्याची निगा करीत नाहीं. दुसरे, आह्मीं कृष्णा, तुंगभद्रा उतरून जावें, तेव्हां येतात. यास्तव समीप जागा योजून ठेविले आहेत. आह्मी जाऊन राहातो या दशहतीने निगा चांगली होते इतका अर्थ. येविसी तीर्थरूपास विनंतिपत्र लिहिलें आहे. तुम्ही समजाऊन संदेह दूर होय ते करणें. आम्ही अविलंबेंच तीर्थरूपासन्निध येतो. आमचा विचार तीर्थरूपाचे आज्ञेशिवाय तिळप्राय नाहीं. तीर्थरूपानीं जातें समई करार केला त्याप्रमाणें त्यांनी करावा हे त्यास उचित आहे. *जाणिजे. छ ४ रबिलावल बहुत काय लिहिणे.